या खेळाडूंची सरकारी नोकरी तर गेलीच, निवडणुकीत देखील झाला पराभव

आपल्या देशात राजकारण आणि खेळ एकमेंकापासून लांब राहिलेले नाहीत. अनेक खेळाडू जे मैदानावर देशाचे नाव उज्जवल करत असतात. असे खेळाडू पुढे जाऊन देशासाठी कार्य करत राहण्यासाठी राजकारणात देखील सहभागी होतात. मात्र यातील काही मोजक्याच जणांना यश मिळते.

काही दिवसांपुर्वीच पार पडलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत अनेक खेळाडूंनी राजकारणात पाऊल टाकले. 24 वर्षीय बबिता फोगाट आणि योगेश्वर दत्त यांनी भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू बबिता फोगाट आणि योगेश्वर दत्त यांना पराभवाचा सामना करावा लागला.

काँग्रेसच्या श्रीकृष्ण हुड्डा यांनी योगेश्वर दत्तचा पराभव केला. तर कुस्तीपटू बबिता फोगाटला अपक्ष उमेदवार सोमबीर यांनी पराभवाचा धक्का दिला. एवढेच नाही तर या दोन्ही खेळाडूंना सरकारी नौकरी देखील गमवावी लागले. कारण निवडणुकीच्या आधी प्रशासन विभागाशी संबंधित नोकरीचा राजीनामा द्यावा लागतो.

योगेश्वर दत्त हरियाणा पोलिसात डीएसपी पदावर होता, तरबबिताने इंस्पेक्टर पद सोडले. याशिवाय भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंहने देखील भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा विजय झाला.

या खेळाडूंनी देखील राजकारणात केला आहे प्रवेश –

योगेश्वर दत्त, संदीप सिंह आणि बबिताच्या आधी क्रिकेटर गौतम गंभीर, कीर्ति आझाद, नवज्योत सिंह सिद्धू, मोहम्मद अजहरूद्दीन, मोहम्मद कैफ आणि चेतन चौहान यांनी देखील राजकारणात स्वतःचे नशीब आजमावलेले आहे. याशिवाय राज्यवर्धन सिंह राठोड, असलम शेर खान, परगट सिंह आणि विजेंदर सिंह यांनी देखील राजकारणात प्रवेश केलेला आहे. यातील काहीच जणांनाच यश मिळाले आहे.

 

 

Leave a Comment