येथे ७ दिवसात वधुला दिले जाते सासरी जाताना रडण्याचे ट्रेनिंग


नवी दिल्ली : पूर्वीच्या काळी लग्न झाले की सासरी जाताना वधू रडायची पण अलिकडच्या काळात अनेक वधू लग्नानंतर सासरी जाते वेळी रडत नसल्यामुळे तिला बरेचदा रडत का नाही असा प्रश्न देखील विचारला जातो. कधी कधी केवळ परंपरा म्हणून नववधू रडायची. पण लग्नातील उपस्थितांना रडण्याचा अभिनय वाटू नये आणि व्हिडिओ कॅमेर्‍यामध्ये वधू आणि इतर स्त्रियांचे रडणे नैसर्गिक वाटावे. यासाठी आता एक क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे. या कॅश कोर्सची बातमी सध्या सोशल मीडियावरून चांगलीच व्हायरल होत आहे. पण अद्याप ही घटना खरी आहे की खोटी हे स्पष्ट झालेले नाही.

या व्हायरल होणा-या बातमीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, राधिका राणी या महिलेने वधूंसाठी रडण्यासाठीचा क्रॅश कोर्स सुरू केला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ती राहते. ती सात दिवसात रडण्याचे शिकवते. यात ती वधूला रडण्याची कला शिकवते. एका लग्नप्रसंगी सासरी निघालेल्या वधूला निरोप देताना उपस्थित महिलांना रडूच कोसळत नसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले, त्याक्षणी राधिकाच्या मनात या कोर्सची कल्पना आली असल्याचे राधिका राणी सांगते.

राधिका एकदा मैत्रिणीच्या लग्नात गेली होती त्यावेळी जमलेल्या स्त्रियांना रडायलाच येत नसल्याने, रडण्यास कशी सुरुवात करावी हेच त्यांना कळत नव्हते. प्रथम तू रडायला सुरुवात कर, अशी खूसपूस त्यांच्यात सुरू झाली. कसेबसे करून एका मैत्रिणीने रडण्यास सुरुवात केली, परंतु तिची ओव्हर अँक्टिंग पाहून वधू रडण्याऐवजी हसायलाच लागली. उपस्थितांनादेखील हा हास्यास्पद प्रसंग पाहून हसू अनावर झाले आणि सर्व वातावरण हास्यमय झाले. सासरी निघालेल्या वधूला निरोप देताना रडू कोसळणे हल्ली कठीण जात असल्याचे राधिकाचे मानणे आहे. लग्नासाठी पैसा खर्च केला जाऊ शकतो परंतु, घरातल्याच मंडळींना रडाव लागते. आपण हा कोर्स या कारणानेच सुरू केला, जो वधूला आणि इतर स्त्रियांना निरोपाच्या वेळी कसे रडावे, याची शिकवण देईल, असे राणी सांगतात.