हायपरटेंशनचा धोका


जागतिक आरोग्य संघटनेने १७ मे हा दिवस जागतिक हायपरटेंशन दिन म्हणून जाहीर केला होता. त्या निमित्ताने विविध माध्यमांमध्ये हायपरटेंशनबाबत चर्चा झाली आणि काही नवनवी माहिती उजेडात आली. या माहितीमध्ये अशी एक धक्कादायब बाब समोर आली आहे की आरोग्याचा हा दोष आता तरुण मुलांमध्येही दिसायला लागला आहे. अन्यथा ब्लडप्रेशर किंवा हायपरटेंशन हा विकार साधारणतः वृध्दांमध्येच आढळतो असे समजले जात होते. पण आता तरुण वर्गही त्याला बळी पडायला लागला आहे. तरुण वर्गामध्ये हा विकार वाढत चालल्याचे २००५ साली दिसून आले होते. मात्र २०१५ साली पुन्हा एकदा केलेल्या पाहणीमध्ये हायपरटेंशनचे तरुण रुग्ण दुपटीने वाढले असल्याचे दिसून आले.

सुमारे १० टक्के तरुणांमध्ये हायपरटेंशनचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. १८ ते २५ या वयोगटातील ७ टक्के तरुणांमध्ये हायपरटेंशन असल्याचे दिसले आहे. प्रामुख्याने लठ्ठपणामुळे हा विकार जडतो. मर्यादेपेक्षा अधिक वजन असणार्‍या तरुणांपैकी ३५ टक्के तरुण हायपरटेंशनच्या विकाराने बाधित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या विकाराची कारणे सांगताना लठ्ठपणा हे सर्वात मोठे कारण असल्याचे आवर्जुन सांगितले जाते. त्यामुळे तरुणांना लठ्ठपणा टाळण्याचा सल्ला दिला जातो. लठ्ठपणा हा बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतो म्हणूनच हायपरटेंशन टाळण्यासाठी जीवनपध्दतीत बदल करणे गरजेचे ठरले आहे. अतिरिक्त तेलकट पदार्थ खाणे, साखर खाणे आणि विशेष म्हणजे मिठाचे भरपूर सेवन करणे या सवयी बदलल्या पाहिजेत तरच तरुण पिढी या विकारापासून दूर राहील.

जीवनपध्दतीच्या बदलामध्ये दररोज शारीरिक हालचाली भरपूर करणे, वजन घटवणे, मीठ कमी घातलेले पदार्थ खाणे आणि फळे तसेच भाज्या यांचे अधिक सेवन करणे या गोष्टींचा समावेश होतो. त्या व्यतिरिक्त आपल्या मनावर आणि शरीरावर येणारा तणाव कमी करण्याचे कौशल्य प्राप्त करणे आणि धूम्रपान, मद्यपान कमी करणे याही गोष्टींचा या उपायांमध्ये समावेश होतो. शरीराच्या हार्मोन्समध्ये होणारे बदल हेही हायपरटेंशनला कारणीभूत ठरतात. या वयातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कारण आहाराच्या पध्दती बदलत आहेत. त्या सार्‍या पध्दतीचा त्याग केल्याशिवाय उगवती पिढी या विकारापासून दूर राहणार नाही. अन्यथा हायपरटेंशनच्या मागोमाग हृदयविकाराचाही उद्भव होण्याचा धोका आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही