शिक्षण, करिअर आणि नोकर्या यांचा विचार फारसा केला जात नाही आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसहीत पालक संभ्रमाच्या अवस्थेत असल्याचे दिसते. बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कोणता अभ्यासक्रम निवडावा याचा निर्णय घेण्यासाठी आधी मुलाची कल चाचणी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची इच्छा काय आहे हे विचारले पाहिजे. या दोन गोष्टींशी शक्य असेल तर पालकांच्या महत्त्वाकांक्षेचा मेळ घालून मुलांच्या भावी वाटचालीची दिशा ठरवली पाहिजे. परंतु एवढा तारतम्याने मुलांच्या अभ्यासक्रमाची निवड करण्याचे भाग्य फारच कमी मुलांना लाभते. बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालक विद्यार्थ्यांचा लोंढा कोणत्या उच्च शिक्षणाकडे चालला आहे याचाच केवळ विचार करून त्याच दिशेने आपल्या मुलांना जायला भाग पाडतात. सध्या अजूनही आपल्या समाजामध्ये डॉक्टर आणि इंजिनिअर या दोन व्यवसायांविषयी नको एवढे आकर्षण आहे आणि आपला मुलगा किंवा मुलगी या दोन पैकी एका व्यवसायातच यावी असा पालकांचा अट्टाहास दिसत आहे.
करिअर भान आवश्यक
या संबंधात विविध पातळ्यांवर आणि माध्यमांमधून वारंवार चर्चा होत आलेली आहे. परंतु अजूनही डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचे आकर्षण कमी होताना दिसत नाही. त्यातल्या त्यात डॉक्टर होणे हे फार महाग झालेले आहे. त्यामुळे डॉक्टरकीच्या तुलनेत अभियांत्रिकीकडे लोकांचा थोडा जास्त कल आहे. साधारण २५ वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे अनावश्यक आकर्षण बी.एड आणि डी. एड. या दोन अभ्यासक्रमांविषयी निर्माण झालेले होते. कित्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जमिनी विकून आणि मोठी कर्जे काढून हे अभ्यासक्रम पूर्ण केले. मात्र प्रत्यक्षात पदवी हातात पडल्यसानंतर त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली. परिणामी महाराष्ट्रात आज या दोन पदव्या मिळवलेले लक्षावधी तरुण आपण कधी शिक्षक होणार याची वाट पहात आहेत. त्यांची अवस्था बघून या दोन अभ्यासक्रमांविषयीचे आकर्षण आता ओसरले आहे. तशीच अवस्था येत्या काही वर्षात अभियांत्रिकी शिक्षणाची होणार आहे. त्याची चाहूल आता लागत आहे. एका बाजूला हे चित्र असतानाच दुसर्या बाजूला असे कित्येक अभ्यासक्रम आहेत की ज्यांना भविष्यातच नव्हे तर आतासुध्दा प्रचंड मागणी आहे. या क्षेत्रांमध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्धसुध्दा होत नाही. म्हणजे एका बाजूला नोकर्या नाहीत पण त्यांच्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार त्यांच्यासाठी धडपडत आहेत आणि दुसर्या बाजूला नोकर्या आहेत पण उमेदवार नाहीत.
आपल्या आसपास नजर टाकली असता असे लक्षात येते की ज्या क्षेत्राचा संगणकाशी संबंध येतो त्या क्षेत्रात पात्र उमेदवार मिळत नाहीत. याची जाणीव काही लोकांना झालेली आहे. परंतु या नोकर्या प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त करणार्यांची संख्या कमी आहे आणि या क्षेत्रात कराव्या लागणार्या परिश्रमास विद्यार्थी तयार नाहीत. जे विद्यार्थी तयार आहेत त्यांना या उत्तम नोकर्या मिळत आहेत. मात्र चांगल्या करिअरसाठी भरपूर मेहनत करावी लागते याची जाणीव विद्यार्थ्यांत निर्माण झालेली नाही. सध्या तंत्रज्ञानात खूप बदल होत आहेत आणि बदलत्या तंत्रज्ञानाने नव्या नोकर्या निर्माण होत आहेत. या बदलत्या जगाच्या हाका ज्याला ऐकू येतात तेच उत्तम नोकर्या मिळवू शकतात. आसपास नजर टाकली असता आणि कान उघडे ठेवून ऐकले असता या हाका ऐकू येऊ शकतात. आता वीज निर्मितीचे परंपरागत मार्ग हळूहळू मागे पडत आहेत आणि येत्या दहा ते वीस वर्षात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अशी गैर परंपरागत ऊर्जा साधने प्रामुख्याने वापरली जाणार आहेत. या क्षेत्रांचे शिक्षण आवर्जुन घेतले पाहिजे तर असे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकर्यास तोटा नाही.
गेली २५ वर्षे माहिती तंत्रज्ञानाचे युग होते. अजूनही ते संपलेले नाही. अमेेरिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा तिथे निर्माण झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वामुळे भारतातल्या आयटी कंपन्यांना अमेरिकेमध्ये थोडे धक्के बसत आहेत. परंतु अन्यत्र या व्यवसायाची गरज आहे तशीच आहे. विशेषतः लष्करामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि लष्करामध्ये हजारो जागा रिकाम्या आहेत. तरुणांना देशाचे संरक्षण क्षेत्र चांगल्या करिअरचा पर्याय म्हणून खुणावत आहे. तेव्हा इंजिनिअरिंग आणि मेडिकल या मळलेल्या वाटा सोडून अशा नव्या वाटांवर तरुणांनी वाटचाल केली पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाच्या बरोबरच आणखी काही तंत्रज्ञाने मोठ्या प्रमाणावर नोकर्या निर्माण करण्यास सज्ज झालेली आहेत. त्यात नॅनो टेक्नॉलॉजी हे एक क्षेत्र दुर्लक्षित राहिलेले आहे. त्या सोबत जैव तंत्रज्ञान हाही विषय आगामी काळात रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात आघाडीवर राहणार आहे. भारतात मेट्रो रेल्वे आणि बुलेट ट्रेन येऊ घातलेल्या आहेत पण त्यांची कामे करणारी तंत्रज्ञ कमी पडत आहेत. या क्षेत्रांची दखल आपण घेतली पाहिजे. आणखी एका क्षेत्राचा विचार मराठी माणसाने केला पाहिजे असे आवर्जुन सांगावेसे वाटते तो म्हणजे स्वयंरोजगार. करिअरच्या अनेक वाटा सांगितल्या जातात परंतु उद्योजक होणे हीसुध्दा करिअरची एक वाटच आहे याची जाणीव महाराष्ट्रात कधी निर्माण करून दिली जात नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी याही पर्यायाचा विचार केला पाहिजे.