प्रदूषणाचे संकट


आरोग्याच्या संदर्भात प्रसिद्ध होणार्‍या लान्सेट या मासिकाने प्रकाशित केलेल्या ताज्या आकड्यांवरून जगातले हवेचे प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेले आहे. हे संकट भारतात तर फारच गंभीर झालेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एखाद्या शहराची प्रदूषणाची पातळी किती असावी याचे काही निकष निश्‍चित केले आहेत. भारतातल्या ३०० प्रमुख शहरांची पाहणी केली असता असे लक्षात आले की, देशातल्या एकाही शहराची प्रदूषणाची पातळी या जागतिक आरोग्य संघटनेने निश्‍चित केलेल्या निकषांत बसत नाही. म्हणजे या निकषांच्या बाबतीत असे म्हणता येते की भारतात एकही प्रदूषणमुक्त शहर नाही.

अर्थात हे प्रदूषण घातक आहेच हे काही सांगण्याची गरज नाही. त्यापासून रोज नवे विकार पसरत आहेत. त्यांनी अनेकांना जीवाला मुकावे लागत आहे. भारतात दर मिनिटाला सरासरी दोन लोक प्रदूषणाने निर्माण झालेल्या विकारांचे बळी ठरतात. वर्षात ही संख्या दहा लाखावर जाते. लान्सेटने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, जगातली अतीशय प्रदूषित असलेली शहरे मोजली तर अशा यादीत भारतातल्या सर्वात अधिक शहरांचा समावेश होतो. भारत आणि त्यातल्या त्यात दक्षिण आशिया हा भाग प्रदूषणाने बाधित झाल्याने अनेक प्रकारच्या आजारांनी त्रस्त आहे. अपुर्‍या दिवसाची मुले जन्मण्याचे प्रमाण भारतात जगात सर्वात जास्त आहे. २०२० साली महाशक्ती होण्याची स्वप्ने पाहणारा हा देश याबाबतीत जगातल्या सर्वात गरीब देेेशांच्याही मागे आहे.

प्रदूषणातून निर्माण होणार्‍या अपुर्‍या दिवसाच्या प्रसूतीच्या समस्येतही असेच आपण जगात सर्वांच्या पुढे आहोत. अमुक एक समस्या केवळ महिलांंना त्रासदायक ठरणारी आहे असे दिसले तर ती सोडवण्याच्या बाबतीत सगळेच उदासीन असतात. पर्यावरणात बदल होत आहे. तो बदल आणि हे वाढते हवेचे प्रदूषण या एकमेकांत गुंतलेल्या समस्या आहेत. त्यांची सोडवणूक फार जागरूकतेने करायला हवी. कारण वाढत्या प्रदूषणाने मानवी आरोग्याला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. हवामानात ऋतुनुसार होणार्‍या बदलाने हिवाळ्यात धुके निर्माण होते हे आपण अनेक वर्षे अनुभवत आहोतच पण आता या धुक्यात प्रदूषक घटकांची भर पडून भारताच्या उत्तर भागातल्या अनेक शहरात एक विचित्र समस्या निर्माण झालेली दिसत आहे. या विशिष्ट हवेने शाळांना सुटी द्यावंी लागते. रेल्वेची वाहतूक बंद होतेे. हवाई वाहतूक विस्कळित होते आणि नागरी जीवनावर वाईट परिणाम होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment