लक्ष्मीपूजनाला मीठ का आणतात ?


दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनाला अनेक प्रथा पाळल्या जातात. त्यातल्या काही प्रथा का पाळायच्या याचा काही बोध आपल्याला होत नाही पण त्या आपण तशाच पाळत असतो. पण त्यामागची कारणे समजून यायला लागतात तसा आपल्या इतिहासावर प्रकाश पडायला लागतो. आपल्या देशात काही लोक दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी बाजारातून मीठ आणतात आणि लक्ष्मीपूजनाच्या आराशीत ते ठेवतात. यामागचे कारण काय असावे यावर विचार केला असता असे लक्षात आले की, पूर्वीच्या काळी जगभरात वस्तूच्या देवाणघेवाणीत मिठाचा वापर पैशासारखा होत होता. आता पैशाचा आणि चलनाचा शोध लागला पण ज्या काळात तो लागला नव्हता तेव्हा मीठच चलनासारखे वापरले जात होते.

मीठ का वापरले जात असेल यामागचे कारणही तसेच आहे. कोणी कितीही श्रीमंत असो की गरीब असो त्याला कमी किंवा जास्त असेल पण पैसा लागतोच ना ? तसेच मिठाचे आहे. गरीब, श्रीमंत अशा सर्वांना खायला मीठ लागतेच. तेव्हा सर्वांना जी गोष्ट लागतेच तिचाच वापर चलनासारखा करावा असे त्या काळातल्या लोकांना वाटत असे. आता आपण चलन म्हणून नोटा आणि नाणी यांचा वापर करतो आणि या नोटा आणि नाण्यांनाच लक्ष्मी मानतो. त्या नोटा आणि नाणी लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवासमोर ठेवतो. त्यांची पूजा करतो. तेव्हा मीठ हेही जर चलन होते तर त्यालाही लक्ष्मी मानले पाहिजे आणि लक्ष्मीपूजनात त्याला पूजेसाठी समोर ठेवले पाहिजे. आता अनेक लोक लक्ष्मीपूजनात थोडे का होईना पण मीठ ठेवतात. विशेषत: बाजारातून आणून ते ठेवतात. त्या सर्वांना या मागचा हा इतिहास माहीत असतोच असे नाही.

मीठ हे चलन म्हणून वापरण्याची पद्धत भारतात होती असा काही पुरावा आढळत नाही. भारतात पैसा म्हणून नाण्यांचा वापर करण्याची प्रथा निर्माण होण्याच्या आधी चलन म्हणून कवड्यांचा वापर होत होता. त्याच्याही पूर्वी मातीचे भाजलेले तुकडे वापरले जात होते. मग भारतात मिठाचा वापर चलनासारखा होत नव्हता तर मग त्याची पूजा करण्याची परंपरा का निर्माण झाली? भारतात मीठ चलन म्हणून वापरले जात नसले तरी ते यूरोपात वापरले जात होते. आपला यूरोपाशी मोठा व्यापार होता. त्यामुळे त्यांच्याशी व्यापार करताना मिठाचा वापर झाला असेल. त्यातून ही प्रथा आपल्याकडे आली. म्हणजे या प्रथेतून आपला युरोपाशी मोठा व्यापार होता यावर प्रकाश पडतो.

Leave a Comment