महायुतीच्या सत्तेत आम्हाला मिळाले पाहिजे कॅबिनेट मंत्रीपद ; रामदास आठवले


नवी दिल्ली – सध्या झारखंड दौऱ्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे असून त्यांनी या दरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत झारखंडमध्ये पक्षाला आणखी सबळ करण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा केली. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षातर्फे झारखंड येथील आगामी विधानसभा निवडणुकात ३ ते ४ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी एनडीएकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. आठवले याकरिता झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच दास यांच्याकडून जर या मुद्द्यावर नकार आला आणि युती नाही झाली तर, पक्ष काही जागांवर निवडणूक लढवणार आणि उर्वरित जागांवर भाजपचे समर्थन करणार असल्याचे आठवले म्हणाले.

रामदास आठवले महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालाबाबत बोलताना म्हणाले, ५ जागांवरून रिपब्लिकन पक्षाने निवडणूक लढवली होती. आम्हाला त्यातील २ जागांवर विजय मिळाला आहे. महाराष्ट्रात २०० च्या वर जागा युतीला मिळण्याची अपेक्षा होती. पण तसे झाले नसले तरी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे सरकार आले असून मुख्यमंत्री भाजपचा असेल. तसेच आमच्या पक्षाच्या जिंकलेल्या उमेदवारांसाठी एक राज्यमंत्री पद आणि एक कॅबिनेट पद देण्यात यावे, अशी मागणी असल्याचेही आठवले म्हणाले. सोबतच त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. मोदी हे आजघडीला सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत. जनतेला त्यांच्यावर आणि भाजपवर विश्वास असल्याचे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Comment