कराची – भल्याभल्या फलंदाजांची आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत भंबेरी उडवणारा पाकिस्तानचा दिग्गज माजी गोलंदाज वसिम अक्रम आता आपल्या एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. आता अभिनयाच्या क्षेत्रात अक्रम पदार्पण करणार असून या क्षेत्रात तो यशस्वी ठरतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आता बायकोसोबत अभिनय क्षेत्रात नशीब आजमवणार वसिम अक्रम
पाकिस्तानमध्ये ‘मनी बॅक गॅरंटी’ नावाचा एक विनोदी चित्रपट अक्रमने साइन केला आहे. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार तो आपल्या पत्नीसह या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन पाकिस्तानचे विनोदी कलावंत फैसल कुरेशी करणार आहे. कुरेशी यांचा दिग्दर्शन म्हणून हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानचा स्टार अभिनेता फवाद खान या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. फवादने ‘खूबसूरत’ आणि ‘कपूर अँड सन्स’ या बॉलिवूडपटांत काम केले होते. या चित्रपटात वसीम अक्रमची पत्नी शनायरा अक्रम छोट्य़ा भूमिकेत दिसणार असल्यामुळे अक्रम आणि शनायरा यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री कशी असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.