शिवरायांच्याबाबत गरळ ओकणाऱ्या छिंदमचे डिपॉझिट जप्त


अहमदनगर – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गरळ ओकणाऱ्या अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याचा दारुण पराभव झाला आहे. छिंदमला अहमदनगर शहर या मतदारसंघातून मायावतींच्या बहुजन समाज पक्ष (बसपाने) तिकीट दिले होते. पण राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप या मतदारसंघामधून पुन्हा निवडून आले आहेत. तर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हे दुसऱ्या क्रमांकावर होते

२०१८ साली फेब्रुवारी महिन्यामध्ये सोशल मीडियावर फोनवरील संभाषणादरम्यान शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर छिंदम चर्चेत आला होता. त्याला या प्रकरणामध्ये त्याचे पद गमवावे लागले होते. तसेच भाजपनेही त्याला पक्षाबाहेर हाकलले होते. छिंदम या सगळ्या गोष्टी घडूनही डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या अहमदगनर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून लढला. विशेष म्हणजे छिंदम प्रभाग क्रमांक ९ मधून एक हजार ९७० मतांनी अपक्ष म्हणून निवडूनही आला. त्यामुळे त्याने आता विधानसभा निवडणूक लढवण्याचाही निर्णय घेतला. पण विधानसभा निवडणुकीमध्ये त्याला केवळ २ हजार ९२३ मते मिळाली आहेत. त्यामुळेच त्याचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.

Leave a Comment