मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर शिवसेनेशी तडजोड नाही – भाजप


मुंबई – शिवसेना-भाजपमध्ये महाराष्ट्रात सत्ता स्थापनेपूर्वी तीव्र मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर शिवसेना आमदारांची आज बैठक पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपला ५०-५० फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली. शिवसेना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी भाजप मान्य करणार नाही. सर्वाधिक १०५ जागा भाजपने जिंकल्या असून १० अपक्षांचा पाठिंबा मिळवला आहे. नव्या सरकारमध्ये अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेनेने केली तर हे भाजप मान्य करणार नसल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

५०-५० च्या फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही आहे. या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासह समसमान खातेवाटप करावे लागेल. २२० पेक्षा जास्त जागांवर विजयाचा दावा महायुती करत होती. पण भाजपला १०५ आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेचा भाव वधारला आहे.

Leave a Comment