शिवसेना आपल्या फॉर्म्युल्यावर ठाम


मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ तर शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान, तासाभराच्या खलबतांनंतर ही बैठक पार पडली असून भाजपने लेखी स्वरूपात सत्तास्थापनेचे सूत्र द्यावे, अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

आता राज्यात सत्ता स्थापनेला वेग आला असून शिवसेनेची सत्तास्थापनेत भूमिका काय असावी यासंदर्भातील एका बैठकीचे आयोजन आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी करण्यात आले होते. शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार यावेळी उपस्थित होते. सत्तास्थापनेचे सूत्र भाजपने लेखी स्वरूपात द्यावे, अशी मागणी तासभर चाललेल्या या बैठकीदरम्यान आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच समसमान वाटप सत्तेचे करण्यात यावे, अशी मागणीही आमदारांनी केली. त्याचबरोबर सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील, असेही बैठकीत ठरवण्यात आले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यापूर्वी आमची चर्चा झाली होती. आम्ही त्यावेळी ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युलावर चर्चा केली होती. तसेच राज्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यावरही चर्चा करण्यात आली होती. मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समसमान वाटा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आमच्यासाठी उपमुख्यमंत्रीपद हे दुय्यम आहे. भाजपने सत्तास्थापनेचे सूत्र लेखी स्वरूपात दिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी दिली. जागा वाटपाचा फॉर्म्युला काही अपरिहार्य कारणांमुळे शक्य झाला नव्हता. सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार आता उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील. जो निर्णय ते घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी नमूद केले.

हरियाणासारखी महाराष्ट्र विधानसभा त्रिशंकू नसली तरी ‘निरंकुश’ही राहणार नाही याची काळजी मतदारांनी घेतली आहे. सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीनेच दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षही प्रबळ राहील याची व्यवस्था जनतेने केली आहे. या राज्यांमध्ये आता भविष्यात नेमके काय घडेल, सत्तेचे राजकारण कोणते वळण घेईल हा मुद्दा वेगळा, असे शिवसेनेने म्हटले होते. हरयाणा काय किंवा महाराष्ट्र काय, दोन्ही राज्यांमध्ये भौगोलिकदृष्ट्या मोठे अंतर आहे. सांस्कृतिक आणि इतर बाबतीतही ते भिन्न आहेत.

Leave a Comment