काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचित, एआयएमआयएममुळे २५ जागांचा फटका


मुंबई – वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएममुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे २५ जागांचा फटका बसला आहे. लोकसभेला एकत्र असणारी वंचित बहुजन आणि एआयएमआयएमची आघाडी विधानसभेला तुटली. विधासभेलाही हे दोन पक्ष एकत्र असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी नुकसान झाले असते. अल्पसंख्यांक समाजाचा दोन्ही पक्षांना मोठया प्रमाणावर पाठिंबा मिळाला.

काँग्रेसचा हा समाज पारंपारिक मतदार समजला जातो. काँग्रेसला १५ तर राष्ट्रवादीला १० विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएमचा फटका बसला. नांदेड उत्तर मतदासंघात काँग्रेस उमेदवार डी.पी.सावंत यांचा शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांनी १२,१०६ मतांनी पराभव केला. कल्याणकर यांना ६२,८८४ तर सावंत यांना ५०,७७८ मत मिळाली. एआयएमआयएमच्या फिरोझ लाला यांना ४१,८९२ तर वंचित बहुजन आघाडीच्या मुकूंद चावरे यांना २६,५६९ मते मिळाली.

मुंबईत चांदिवली काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. तिथे शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी अवघ्या ४०९ मतांनी विजय मिळवला. येथे वंचितच्या अब्दुल हसन खान यांनी ८८७६ आणि एआयएमआयएमच्या मोहम्मद इमरान कुरेशी यांना १,१६७ मते मिळाली. चाळीसगावमध्ये भाजपच्या मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांचा ४,२८७ मतांनी पराभव केला. येथे वंचितच्या मोरसिंह राठोड यांनी ३८,४२९ मते मिळाली.

Leave a Comment