
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या निकालात युतीपेक्षा आघाडीच्या जागा जरी कमी आल्या असल्या तरी मुख्यमंत्री कोण होणार? हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचालींनांही वेग आला आहे. त्यातच आता तर शिवसेनेला सत्ता स्थापनेची काँग्रेसने खुली ऑफर दिली आहे.
भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसची शिवसेनेला खुली ऑफर
राजकीय घडामोडींना राज्यात वेग आला असून एकीकडे पवारांच्या भेटीला बाळासाहेब थोरात गेले आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीवर शिवसेनेची बैठक झाली. अशातच शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने खुली ऑफर दिली आहे. जर शिवसेनेचा प्रस्ताव आला तर आमच्या हायकमांडशी आम्ही बोलू असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. शिवसेनेला अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद हवे की ५ वर्षाचे. भाजपच्या कोर्टात मुख्यमंत्रीपदाचा निर्णय असल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला अडीच वर्ष वाट बघावी लागणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
सत्तेपासून भाजपला रोखायचे असेल तर शिवसेनेने पुढे आले पाहिजे. पण असा कुठलाही प्रस्ताव शिवसेनेने दिलेला नाही. भाजप सोडून सत्ता बनवली पाहिजे असे राज्यातील जनतेला वाटत आहे. सत्तेपासून भाजपला दूर ठेवले पाहिजे. पण यात शिवसेनेची भूमिका निश्चित झाली पाहिजे असेही वेडट्टीवार म्हणाले.
भाजपचे शासकीय यंत्रणांचा वापर करून दबावाने विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र होते. ताकदीने आम्ही लढलो असतो तर राज्यात परिवर्तन दिसले असते. आमच्या सोबत वंचित असती तर आम्ही राज्यात सत्ता बनवू शकलो असतो, असेही वडेट्टीवार म्हणाले. आज मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेतली ही माहिती त्यांनी त्यावेळी दिली. मी विरोधी पक्षनेता म्हणून राज्यातील जनतेचे आभार मानतो. राज्यातील जनतेची आघाडीला हातात सत्ता देण्याची मानसिकता होती. पण जनतेचा कौल समजायला आम्ही कमी पडल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर लोक थारा देत नाहीत. या सरकारने अडीच लाख कोटीचे कर्ज साडेपाच लाख कोटीवर नेले आहे. अंगणवाडी सेविकांचे पगार मिळत नाहीत. राज्य डबघाईला गेले आहे. सत्तेची गुर्मी कराल तर तुमची जागा दाखवू हा सुजाणपणा जनतेने दाखवून दिला आहे. राज्यातील जनतेने दिलेला कौल मान्य करून उद्याचा महाराष्ट्र भाजपपासून सत्तामुक्त हवा आहे. भाजपला सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार राहिला नाही. विरोधी पक्षाचे नेते आपल्या पक्षात घेतले. आमच्याही काही लोकांनी हलकटपणा दाखवला, सत्तेचा हावरटपणा दाखवला त्यांना जनतेने जागा दाखवून दिल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
