दागिन्यांची निवड करताना..


नुकताच दसऱ्याचा सण पार पडला. लवकरच दीपावलीचे आगमन ही होत आहे. त्यातून लग्न समारंभाचा मोसमही सुरू होत असून, पुष्कळसा महिलावर्ग येणाऱ्या सणासुदीसाठी आणि मंगल कार्यांसाठी नवनवे पेहराव आणि दागिन्यांच्या खरेदीत व्यस्त झालेला दिसतो आहे. आजकाल नवनवीन ढंगाचे पेहराव आणि त्याच्याच जोडीने तऱ्हेतऱ्हेच्या घडणीचे दागिने घालताना, काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

जर कानामध्ये मोठ्या आकारचे डूल ( डँग्लर ) घालावयाचे असतील, तर गळ्यामध्ये अनेक सरी किंवा लेअर असलेले नेकलेस घालणे टाळावे. त्याचबरोबर हातामध्ये मोठी ब्रेसलेट्स घालणे ही टाळावे. दागिन्यांची निवड करताना, कानातील डूल मोठे असतील तर गळ्यातील नेकलेस नाजूक असावा. किंवा गळयातील नेकलेस अनेक सरींचा, मोठे पेंडन्ट असणारा असेल, तर कानामधील डूल किंवा टॉप्स नाजूक डिझाईनचे असावेत.

केशरचना करताना त्यासाठी खूप साऱ्या अॅक्सेसरीज वापरण्याचे टाळावे. केशरचना करत असताना खूप अॅक्सेसरीज वापरल्यास तुमच्या पेहरावाकडे लोकांचे लक्ष न जाता, केवळ तुमच्या केशरचनेकडेच लोकांचे जास्त लक्ष जाईल. तुमची केशरचना ही तुमच्या पेहरावाला पूरक, म्हणजेच कॉम्प्लिमेंट करणारी हवी. केशरचना करताना, ती दिवसभर तशीच ठेवणार असाल तर ताज्या फुलांऐवजी कृत्रिम फुले वापरणे जास्त चांगले. ताजी फुले, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लवकर सुकून जाऊन त्यांमधून दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे आजकाल बाजारात, खास केशरचनेसाठी म्हणून मिळणाऱ्या कृत्रिम फुलांचा वापर करावा.

आपल्या पेहरावाच्या गळ्याचा आकार कसा आहे हे बघून आपल्या नेकलेसची निवड करावी. जर आपल्या पेहरावाचा गळा खोल असेल, तर गळ्याशी घातले जाणारे चोकर पद्धतीचे, किंवा थोडेसेच लांब, असे नेकलेस निवडावेत. जर गळा अगदी कमी खोलीचा किंवा बंद असेल, तर मोठे पेंडन्ट असलेले लांब नेकलेस निवडावेत. त्याचप्रमाणे गळ्याच्या अवतीभोवती खूप जरीचे काम असेल, तर नेकलेस ला अजिबात फाटा देऊन, त्याऐवजी मोठ्या इयररिंग्स किंवा डूल घालावेत. एखादा भारदस्त नेकलेस आणि त्याच्याच जोडीला तितकेच भारदस्त डूल असा सेट जरी असला, तरी दोन्हीही वस्तू एकदम घालण्याचा मोह आवरावा. मोठा नेकलेस असेल, तर त्याच्या जोडीने नाजूक, लहान डूल घाला. डूल मोठे असतील, तर त्यांच्या जोडीने नाजूक, एखादीच सर असलेला नेकलेस घाला, किंवा नेकलेस अजिबातच घालू नका.

आपण घालणार असलेले दागिने आपल्याला आरामदायक असतील हे पाहावे. अगदी गळ्याभोवती असणारा चोकर काही वेळानंतर त्रासदायक वाटू शकतो. तसेच हातामध्ये असलेली ब्रेसलेट किंवा बांगड्या आपल्या पेहरावामध्ये सारखे अडकत असल्याने, पेहरावावरील नाजूक जरीकाम खराब होण्याचा संभव असतो. आपण घालणार असलेल्या अंगठ्या जर घट्ट असतील तर त्यामुळेही त्रास होऊ शकतो. त्यामुळे दागिन्यांची निवड करताना, दागिने जास्त वेळाकरिता अंगावर राहिल्यानेही आपल्याला त्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही हे पाहूनच कोणते दागिने घालायचे ते ठरवावे.

Leave a Comment