“सामना”च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी टोकले भाजपचे कान


मुंबई – सामना संपादकीयच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक निकालाचे विश्लेषण केले असून महाराष्ट्राच्या जनतेचा कौल स्पष्ट आणि सरळ आहे. त्याचबरोबर त्यांनी उतू नका मातू नका नाहीतर माती होईल, असा जनादेश देणारा निकाल ‘ईव्हीएम मधून बाहेर आला असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना शेवटच्या क्षणापर्यंत फक्त कमळेच ‘ईव्हीएम’ मधून बाहेर येतील असा आत्मविश्वास वाटत होता. पण १६४ पैकी ६३ठिकाणी कमळे फुलली नाहीत असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.

शिवसेना – भाजप युतीस सरकार स्थापन करण्याइतके बहुमत संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल पाहता मिळाले आहे. संसदीय लोकशाहीत ‘आकड्यां’ चा खेळ चालत असतो. स्पष्ट बहुमताचा ‘युती’ चा आकडा आहे. १६० च्या आसपास शिवसेना आणि भाजप मिळून आकडा आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ठरवून दिलेला हा निकाल आहे . मग त्यास महाजनादेश म्हणा नाही तर आणखी काही. हा जनादेश आहे. महाजनादेश नाही हे मान्य करावे लागेल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

मनाचा मोठेपणा जनतेचा कौल स्वीकारण्यासाठी दाखवावाच लागतो. हा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे. महाराष्ट्रात २०१४ पेक्षा वेगळा निकाल लागला होता. २०१४ साली ‘ युती ‘ नव्हती. २०१९ साली ‘ युती ‘ असतानाही जागांची घसरण झाली. बहुमत मिळाले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून शंभर जागांचा टप्पा गाठला. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून मतदारांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली. हा एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना मिळालेला धडा असल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

जनतेने धाक, दहशत, सत्तेची मस्ती यास बळी न पडता जे मतदान केले सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. कोणतेही नेतृत्व काँग्रेसला नव्हते. राज्यात त्या बिनधडाच्या काँग्रेसला ४४-४५ च्या आसपास जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अशी काही फोडली की, हा पवारांचा पक्ष तोळामांसाचा तरी शिल्लक राहील काय, असा माहोल निर्माण झाला . पण राष्ट्रवादीने महाराष्ट्रात सर्वात जास्त उसळी मारली आहे व त्यांनी पन्नाशी पार केली. भाजप १२२ वरून १०२ वर घसरला. शिवसेना ६३ वरून खाली आली. त्याचबरोबर इतरही अपक्ष, बंडखोर, छोटे पक्ष मिळून पंचवीस जणांनी विजय मिळाला आहे. तसे म्हटले तर हा कौल अधांतरी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर फार शहाणपणा करू नका. उतू नका, मातू नका. सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा ! असा जनादेश राज्याच्या जनतेने दिला असल्याचे स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले आहे.

राजकारणात कोणालाही सत्तेचा उतमात करून कायमचे संपवता येत नाही आणि ‘ हम करे सो कायदा’ चालत नाही. भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपच्या अनेक बालेकिल्ल्यांत मारलेल्या मुसंडीचे विश्लेषण करायला वेळ लागेल. पक्ष फोडून व पक्षांतरे घडवून मोठा विजय मिळवता येतो हा भ्रमाचा भोपळा राज्याच्या जनतेने फोडला. पक्षांतरे करून ‘टोप्या‘ बदलणाऱ्यांना जनतेने घरी पाठवले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात दारुण पराभव झाला. शिवरायांचे वंशज म्हणून कॉलर उडवत फिरणाऱ्या उदयनराजे यांचे वर्तन नीतिमत्तेचे असायला हवे होते. सातारची गादी छत्रपती शिवरायांची म्हणून मानसन्मान असल्यामुळे छत्रपतींचे नाव घेऊन कुणी अल्टी-पल्टी करत असेल तर चालणार नाही हे सातारकरांनी दाखवून दिले. उदयनराजे भोसले यांचा हा व्यक्तिगत पराभव असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

राष्ट्रवादी व काँग्रेसला “शिवसेना-भाजप यांनी ‘ युती ‘ म्हणून लढूनही एवढे यश का मिळाले ? महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांनी दहा सभा घेतल्या. ३७० कलमावर अमित शहा यांनी चाळीस सभा घेतल्या. मोदी यांनी उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्यात खास सभा घेतली. दिल्लीत अमित शहा यांच्या बंगल्याच्या हिरवळीवर उदयनराजे यांचे पक्षांतर झाले व आता सातारचे छत्रपतीच भाजपसोबत असल्याने महाराष्ट्रात आपल्यालाच शिवरायांचा आशीर्वाद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले; पण सातारच्या जनतेने उदयनराजे यांचा पराभव केला. यापासून काय तो धडा घेणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मोठ्या विजयाचे स्वप्न भंग पावले; पण सत्ता राखता आली एवढेच काय ते समाधान. पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाचाही कस लागला. ते एका जिद्दीने लढले. महाराष्ट्रातील तेल लावलेला शक्तिशाली पहेलवान म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतःला घोषित केले; पण मोठ्या मनाने मान्य केले पाहिजे की ते ‘तेल’ थोडे कमी पडले व मातीतल्या कुस्तीतील वस्ताद म्हणून शरद पवार यांनी गदा जिंकली असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे कौतुक केले आहे.

Leave a Comment