रोहित पवार यांना राम शिंदेंनी बांधला ‘विजयी’ फेटा


अहमदनगर – रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर विरोधी उमेदवार राम शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांनी यावेळी राम शिंदे यांच्या मातोश्रींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. राम शिंदे यांनी यानंतर रोहित पवार यांना फेटा बांधला. यापूर्वी स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सेनेच्या धर्यशील माने यांना विजयी फेटा बांधला होता.

संपूर्ण राज्याचे लक्ष कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे लागून राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष साजरा केल्यानंतर रोहित यांनी थेट जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी जाऊन राम शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो हा संदेश दिला. पराभव झालेला असूनही मनाचा मोठेपणा दाखवत रोहित पवार यांच्यासोबत आपल्या घराच्या दरवाजापर्यंत येत राम शिंदेंनी त्यांना निरोप दिला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजय झाल्यानंतर शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांनी देखील अशाच पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन शेट्टी यांच्या मातोश्रींचे दर्शन घेतले.

Leave a Comment