साताऱ्यात उदयनराजे तब्बल ८० हजार मतांनी पिछाडीवर


सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उदयनराजे भोसले यांना प्रचंड मोठा धक्का बसत असून येथील पोटनिवडणुकीत आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत तब्बल ८० हजार मतांनी उदयनराजे हे पिछाडीवर आहेत. तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी मोठी आघाडी घेतल्यामुळे साताऱ्यात उदयनराजे आणि भाजपसाठी प्रचंड मोठा झटका मानला जात आहे.

तत्पूर्वी उदयनराजे यांनी माझे मताधिक्य हे जेवढे अंतर जमीन आणि आस्मानमध्ये आहे तेवढे असणार आहे, असा दावा केला होता. त्याचबरोबर माझ्यासह आमचे इतर सहा उमेदवार देखील हे विजयी झाल्यात जमा असून हा माझा आत्मविश्वास आहे. कारण लोकांमध्ये आम्ही फिरतो. तसेच मला काही गोपनीय रिपोर्ट देखील मिळाले असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे. सात हा माझा लकी नंबर आहे आणि बरोबर सात लोकांनीच निवडणुकीत उमेदवारी अर्ज केले होते. माझा ईव्हीएमवर १ नंबर असल्यामुळे एक नंबरनेच मी लीडने विजयी होणार. तर २४ तारखेला निकाल आहे. माझा वाढदिवस पण २४ तारखेला असतो. अंकशास्त्रानुसार २४ आकडा हा चांगला असतो. त्यामुळे राज्यात २८८ जागी भाजप-शिवसेना युतीच्या सर्व जागा निवडून याव्यात हीच भवानी चरणी प्रार्थना केली. मतदानावर पावसाचा काहीही परिणाम होणार नाही. मी हवामानाचा काल अंदाज घेतला, ते म्हणाले झिरझिर पाऊस पडेल. पण लोक मतदान करतील. त्यामुळे मला विश्वास आहे की, जेवढे अतंर जमीन आणि आस्मानमध्ये आहे तेवढे माझे मताधिक्य असणार, असे म्हणत उदयनराजेंनी आपल्या विजय पक्का असल्याचे ठासून सांगितले होते.

विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक देखील राज्यात घेण्यात आली होती. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणुकीकडे देखील विधानसभेसोबतच सर्वांचेच लक्ष होते. दरम्यान, मतदानानंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधताना विजय आपलाच असल्याचा दावा केला. पण तूर्तास तरी त्यांचा हा दावा खरा ठरताना दिसत नाही. कारण उदयनराजे अतिशय मोठ्या मतांच्या फरकाने मागे आहे. लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळेच साताऱ्यात विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणूक देखील पार पडली होती.

Leave a Comment