राष्ट्रवादीच्या कुरघोडीमुळे रोहिणीचा पराभव – खडसे


जळगाव : भाजपचे निष्ठावंत नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना विधानसभा निवडणुकीत बंडखोरांची बंडाळी आणि भाजपने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. नाथाभाऊंची कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांचा पराभव झाला आहे.

कन्येच्या पराभवावर एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले की, निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळले नाही. भाजपला उत्तर महाराष्ट्रात 40 जागा मिळतील, असे गिरीश महाजन यांनी सांगितले होते. पण तसे झालेले दिसत नाही. ऐनवेळी राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेऊन शिवसेना बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कृत करण्याची खेळी केली होती. मुक्ताईनगरात मागील पाच वर्षांपासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती होती. भाजपला त्याचा फटका बसला आहे. परिणामी कन्या आणि भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे याचा निसटता पराभव झाला. कार्यकत्यांनी खूप परिश्रम घेतले. पण आम्ही कुठे कमी पडलो ते शोधावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

हा पराभव पक्षाने तिकीट कापल्यामुळे झाला का, या प्रश्नावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मुक्ताईनगरात मागील पाच वर्षांपासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्यामुळे भविष्यात काय होऊ शकते, याबाबतची जाणीव पक्षाला आधी करून दिली होती. तसेच पक्षाने घेतलेला निर्णयावर पुर्नविचार करण्यास सांगितले होते. पण, आता त्यावर जास्त बोलता येणार नसल्याचे खडसेंनी सांगितले.

आजवर मराठा उमेदवारांमधील मतविभागणी या मतदारसंघात खडसेंच्या पथ्यावर पडत होती. यंदा ती शक्यता मावळल्याने अन् स्वत: खडसेही मैदानात नसल्याने रोहिणी खडसेंची वाट बिकट बनली होती. दरम्यान, एकनाथ खडसेंचे तिकीट कापल्याने चर्चेत राहिलेली मुक्ताईनगरची जागा भाजपला राखता येईल की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

Leave a Comment