मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करत काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी


मुंबई : शिवसेनेला आपल्या गडातच पराभवाचा जोरदार धक्का बसला असून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात पराभवचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी या मतदारसंघात विजयी झाले आहेत. शिवसेनेने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारल्याने या पराभवाला शिवसेनेला सामोरे जावे लागल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेला अंतर्गत बंडखोरीमुळे पराभव पत्करावा लागला आहे. वांद्रे पूर्वचे विजयी आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आहे. विद्यमान आमदार अशोक पाटील आणि तृप्ती सावंत यांना डावलून शिवसेनेने विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट दिले होते.

काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात 37,636 मते मिळाली, तर शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वरांना 23,069 मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या पराभवामागचे मुख्य कारण म्हणजे शिवसेनेच्या बडखोर तृप्ती सावंत यांना 23,856 मते मिळाली. तर मनसेच्या अखिल चित्रे यांना 10,403 मते मिळाली.

दरम्यान शिवसेनेचे विद्यमान तृप्ती सावंत यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर या समर्थकांसह मातोश्रीबाहेर रात्री ठिय्या मांडला होता. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तृप्ती सावंत यांच्या जागेवर उमेदवारी देण्यात होती. या आंदोलनानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली होती. त्यानंतर काही शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना बेदखल करण्यात आले होते.

Leave a Comment