निकालाआधीच युतीमध्ये सुरू झाली धूसफुस!


मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हे आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हवे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. पण त्याआधीच मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. यासाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून निकाल हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष असलेल्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. संजय राऊत यांची प्रतिक्रिया त्यासंबधी घेतली असता आदित्य ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला हवे असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. तर संजय राऊत यांनी बुधवारी दिलेल्या मुलाखतीमध्येही शिवसेना 100हून जास्त जागांवर जिंकेल. आणि भाजप आमच्याशिवाय सरकार आणू शकणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.

शिवसेनेचा वरळी हा बालेकिल्ला असून शिवसेनेचे सुनील शिंदे 2014 च्या विधानसभा निवणुकीत वरळीचे आमदार झाले. त्याआधी 2009 मध्ये सचिन अहिर आमदार झाले. आता आदित्य ठाकरेंना सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाचा किती फायदा होतो हे या लढतीमध्ये कळेल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पक्षाच्या वतीने बोलण्याऱ्या 18 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत असलेले नेतेच पक्षाची भूमिका मांडतील आणि पक्षाच्या मुद्यांवर प्रतिक्रिया देतील. प्रसारमाध्यमांनीही या यादीत असलेल्या अधिकृत प्रवक्त्यांकडूनच प्रतिक्रिया घ्याव्यात, अशी विनंती हर्षल प्रधान यांनी केली आहे.

या यादीत अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, विशेषा राऊत, भावना गवळी, राहुल शेवाळे, धैर्याशील माने, अनिल परब, मनीषा कायंडे आणि सुनील शिंदे यांचा समावेश आहे. या नेत्यांसोबतच सुरेश चव्हाण, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, हेमराज शहा, साईनाथ दुर्ग, किशोर कान्हेरे, शितल म्हात्रे आणि शुभा राऊल हे पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम पाहतील. तसेच, एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही माध्यमांशी बोलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

Leave a Comment