ब्रिटन मध्ये सुरु झाली पहिली केसांची बँक


ब्रिटनच्या मँचेस्टर मध्ये जगातील पहिली केसांची बँक सुरु झाली असून लोक त्यात दीड हजार पौंड किंवा २ लाख ३० हजार रुपये भरून युवावस्थेतच त्यांच्या केसांचे नमुने फ्रीज करून ठेऊ शकणार आहेत. केस गळायला लागले तर याच केसाचे क्लोनिंग करून पुन्हा त्यांचे डोक्यावर रोपण करता येणार आहे. हे नवे केस तरुणपणीच्या केसांइतकेच मजबूत असतील असे सांगितले जात आहे. ब्रिटन मध्ये ६५ लाख पुरुष टक्कल पडण्याच्या समस्येने त्रासलेले असून त्याच्याकडे उपचारासाठी फारच मर्यादित पर्याय आहेत त्यामुळे ही बँक त्यांच्यासाठी एक दिलासा ठरते आहे.


केस गळणे कमी करण्यासाठी जी औषधे दिली जातात त्याचे दुष्परिणाम होतात. या औषधातील मिनोक्सिडील मुळे डोक्याला खाज येणे, हृदयगती वाढणे असे परिणाम होतात तर दुसऱ्या फिनास्ट्राईड मुळे बेचैनी येते आणि नपुंसकता येण्याची शक्यता असते असे वैद्यकीय तज्ञ सांगतात. हेअर ट्रान्सप्लांट हा आणखी एक पर्याय आहे मात्र तो खुपच खर्चिक आहे आणि तो यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही.

आजकाल प्रदूषण आणि स्ट्रेस मुळे तरुणपणीच केस गळतीची समस्या भेडसावते आहे. गेल्या पिढीच्या तुलनेत या तरुणांना २० वर्षे अगोदरच टक्कल पडते आहे असे निरीक्षण नोंदविले गेले आहे. नव्याने स्थापन झालेल्या केसांच्या बँकेत १०० केसांचा जुडगा मुळासह उणे १८० तापमानात फ्रीज केला जातो. हे केस पातळ होऊ लागले की त्यातील छोट्या पेशी काढून घेतल्या जातात. ठराविक वयानंतर जेव्हा केस कमी होऊ लागतील तेव्हा या जतन केलेली पेशींपासून क्लोन बनवून त्याचे डोक्यावर रोपण केले जाते. नव्याने येणारे केस आरोग्यपूर्ण आणि मजबूत येतात असे सांगितले जात आहे.

Leave a Comment