महाराष्ट्रात पाकिस्तानच्या मुद्द्यावरून प्रचार करण्यात काय अर्थ आहे? – संजय राऊत


मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कलम ३७० आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित केला आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना बुधवारी त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. राऊत यांनी यावेळी म्हटले की, पाकिस्तानच्या मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यात काय अर्थ आहे? केंद्र सरकारची पाकिस्तानविषयी भूमिका काय आहे, हे लोकांना आधीपासूनच ठाऊक आहे.

लोकसभा निवडणुकीत या मुद्द्यावरून जनतेने तुम्हाला मतदान केले. तसेच लोकसभेच्या प्रचारातील राम मंदिराचा प्रश्नही प्रमुख मुद्दा होता. तेव्हा शिवसेना-भाजपला याच मतदारांनी मते दिली. पण विधानसभा निवडणुकीचे मुद्दे पूर्णपणे वेगळे असायला हवेत, असे राऊत यांनी सांगितले.

त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचा संपूर्ण प्रचार विधानसभा निवडणुकीत हा कलम ३७० भोवत केंद्रित होता. प्रत्येक सभेत अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकसंध भारताचा हवाला देत कलम ३७० च्या यशाचा फायदा भाजपला कसा मिळेल, यासाठी पूरेपूर प्रयत्न केले होते. पण विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी कलम ३७० मुद्द्याचे काय काम, असा सवाल केला होता. मोदींनी यावरून विरोधकांना कलम ३७० पुन्हा लागू करून दाखवा, असे आव्हान दिले होते.

Leave a Comment