१२ तासांहून अधिक वेळ लागणार साताऱ्याच्या निकालाला


सातारा – गुरुवारी सकाळी राज्यात एकाचवेळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वच ठिकाणचे निकाल साधारणतः दुपारपर्यंत लागण्याची शक्यता आहे. परंतु, १२ तासांहून अधिक वेळ सातारा जिल्ह्यातील निकालाला लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी माध्यमांना दिली आहे.

साताऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले असल्यामुळे दोन्ही ठिकाणची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे येथील निकाल लागण्यास इतर ठिकाणांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष सातारा लोकसभा मतदारसंघाकडे लागलेले आहे. येथील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करत अवघ्या चार महिन्यात आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केला. ते त्यानंतर पुन्हा भाजपकडून येथे उभे आहेत. राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा केली नव्हती. नंतर आयोगाने येथील लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील प्रचारसभेत पावसात केलेले भाषण प्रचंड गाजले होते. त्यामुळे येथील लढत चुरशीची ठरणार आहे. शिवेंद्रराजे हेही भाजपकडून विधानसभेच्या रिंगणात आहेत.

Leave a Comment