मोदींच्या पावलावर पाऊल ; निकालाआधी फडणवीस केदारनाथांच्या चरणी


नवी दिल्ली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत आज (बुधवार) सकाळी केदारनाथला जाऊन दर्शन घेतले. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथला जाऊन पूजा आणि ध्यान-धारणा केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सपत्नीक केदारनाथला जाऊन दर्शन घेतले.


गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री फडणवीस हे प्रचारात व्यस्त होते. त्यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. ते त्यानंतर पुन्हा प्रचारसभेसाठी राज्यात फिरले. दि. २१ रोजी मतदान झाल्यानंतर दोन दिवसांच्या कालावधीनंतर म्हणजे उद्या मतमोजणी होणार आहे. अनेक नेत्यांनी या दोन दिवसांत विश्रांती घेतली. या कालावधीत फडणवीस यांनीही केदारनाथला जाण्याला प्राधान्य दिले.

त्यांनी बुधवारी सकाळी केदारनाथचे दर्शन घेतले. याची माहिती फडणवीस यांनी स्वतः टि्वट करत दिली. आज सकाळी केदारनाथचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये हर हर महादेव!, असे म्हटले. दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा आजच मुंबईत परतणार आहेत. दरम्यान, उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. सर्वच उमेदवारांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment