आजपासून बीसीसीआयमध्ये सुरु होणार ‘दादा’गिरी


नवी दिल्ली – बुधवारी बीसीसीआय अध्यक्षपदाचा कारभार क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुलीने स्वीकारले. माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चा होती. पण केवळ सौरव गांगुलीनेच १४ ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुली विराजमान होणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार सौरव गांगुलीने आज बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.

आज सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा आजच करण्यात आली आणि त्याची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही त्याच्या अध्यक्षतेखाली आजच होणार आहे. गांगुलीसोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याने बीसीसीआयच्या सचिवपदाचा आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांनी बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यांचीही निवड बिनविरोध झाली.

बिनविरोध बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक पार पडावी, यासाठी विविध राज्य संघटनांनी मुंबईत एक अनौपचारिक बैठक घेतली होती. अध्यक्षपदासाठी त्यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाची चर्चा होती. पण या पदासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला होता.

Leave a Comment