केंद्र सरकारने केले मोठे प्रशासनिक बदल


नवी दिल्ली – मंगळवारी केंद्र सरकारने मोठे प्रशासनिक बदल केले असून ऊर्जा विभागाचे सचिव म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी संजीव नंदन सहाय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुभाष चंद्र गर्ग यांची ते जागा घेणार आहेत. तर ‘यूआयडीएआय’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव पंकज कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गर्ग यांना संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थ विभागाच्या सचिव पदावरून हटवून ऊर्जा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. गर्ग यांनी त्यानंतर सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. सध्या तीन महिन्यांच्या नोटीसवर ते कार्यरत आहेत. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी गर्ग हे निवृत्त होणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) अध्यक्षपदी ब्रज राज शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सीमा व्यवस्थापन विभागाच्या सचिवदी कार्यरत आहेत. तर ‘एनएचएआय’चे अध्यक्ष नागेंद्र नाथ सिन्हा हे ब्रज राज शर्मा यांची जागा घेणार आहेत. गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राज्य सचिवालय परिषदेत सचिवपदी संजीव गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी याच विभागात विशेष सचिव म्हणून कार्यरत होते.

अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम विभागाचे सचिव म्हणून अल्पसंख्यांक प्रकरणांचे सचिव शैलेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश यांच्या जागी प्रमोद कुमार दास हे पदभार स्वीकारणार आहेत. याव्यतिरिक्त ‘दीपम’च्या सचिव पदावरून अनिल कुमार खाची यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी तुहीन कांत पांडेय हे या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. कॅबिनेट सचिवालयातील सचिव (समन्वय) पदावर कॅबिनेट सचिवालयातील अतिरिक्त सचिव राजेश भूषण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९८७ च्या बॅचच्या १३ आयएएस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने बढती दिली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव लीना नंदन या त्याच मंत्रालयाच्या सचिव पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. तर कर्मचारी व प्रशिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आणि आस्थापना अधिकारी प्रदीप कुमार त्रिपाठी यांची विशेष सचिव व आस्थापना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment