यांना का कार गिफ्ट करण्यास तयार झाले आनंद महिंद्रा ?

वृध्द आई-वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्याची प्रत्येकाची ईच्छा असते. काहीजण विमानाने तर काही जण रेल्वेने, ज्याला जसे जमेल तसे आई-वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जातात. मात्र म्हैसूरमधील एका व्यक्तीने आपल्या आईला तीर्थयात्रेला नेण्यासाठी जे केले, ते पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे देखील मन भरून आले.

म्हैसूरमधील डी. कृष्णा कुमार आपल्या स्कूटरवरून 48,100 किमी अंतर पार करून आपल्या आईला तीर्थयात्रेला घेऊन गेले. सोशल मीडियावर त्यांचे हे मातृप्रेम चर्चेचा विषय ठरले आहे. नांदी फाऊंडेशनचे सीईओ मनोज कुमार यांनी त्यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. हा व्हिडीओ बघून आनंद महिंद्रा यांनी देखील त्यांना कार गिफ्ट करण्याची इच्छा व्यक्त केली.

डी. कृष्ण कुमार यांच्या आई म्हैसूरमध्ये एकट्या राहतात. त्यांनी आपल्या मुलाकडे हम्पी बघण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर मुलगा नोकरी सोडून 20 वर्ष जुनी चेतक स्कूटर घेऊन आपल्या आईची इच्छा पुर्ण करण्यासाठी निघाला.

कृष्णा कुमार यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबामध्ये वडिलांचा मृत्यू होईपर्यंत आईची भूमिका ही किचनपर्यंतच मर्यादित होती. मी निर्णय घेतला की, आता माझा संपुर्ण वेळ हा आईसाठीच असेल व तिला जगातील सर्व आनंद देईल.

त्यांची आई घराच्या बाहेर कधीच निघाल्या नव्हत्या. त्यामुळे कृष्ण कुमार यांनी आपल्या आईला भारतातील सर्व तीर्थ स्थान फिरून आणण्याचा निर्णय घेतला. कृष्णा कुमार यांनी 7 महिने आईला स्कूटरवर बसवून प्रवास केला. त्यांनी जानेवारीमध्ये प्रवास सुरू केला होता.

कृष्णा कुमार आणि त्यांच्या आईची ही कथा आंनद महिंद्रा यांच्या मनाला देखील स्पर्शुन गेली. त्यांनी कृष्णाला कार गिफ्ट देण्याची देखील इच्छा व्यक्त केली.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, एक सुंदर कथा. हे एका आईबद्दल असलेले प्रेम तर आहेच, पण त्याचबरोबर देशावरील प्रेम देखील आहे. आनंद महिंद्रा यांनी स्वतः महिंद्रा केयूवी 100 एनएक्सटी गिफ्ट करण्याची इच्छा व्यक्त केली. जेणेकरून आपल्या आईला कारमध्ये बसवून पुढील प्रवासाला जाऊ शकेल.

Leave a Comment