या गोष्टींवरही मिळते विमा कव्हर


जीवन विमा ही बहुतेक सर्वाना माहित असलेली सुविधा. आता रिस्क कमी करण्यासाठी आरोग्य, प्रवास यांचाही विमा उतरविता येतो. घरे, वाहने यांचेही विमे होतात याची माहिती आपल्याला आहे. मात्र आता अनेक स्टार्टअप कंपन्या विविध गोष्टींसाठी विमा देऊ करत असून त्याची फारशी माहिती अनेकांना नाही. या प्रकारच्या विम्याना मायक्रो कव्हर विमा म्हटले जाते. या विम्याची कॉस्ट कमी ठेवण्यासाठी ते ऑनलाईन सेल केले जातात. या छोट्या विमा कंपन्या मोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने काम करतात आणि श्रीमंत, डिजीटल सॅव्ही ग्राहकांना टार्गेट करतात.

एकसन स्टार्टअपच्या सपोर्टने काम करणारी टॉफी इन्शुरन्स कंपनी ब्रांडेड चष्मे, बॅगपॅक, सायकली साठी विमा कव्हर देते. एको जनरल इन्शुरन्स मोबाईल, मिस्ड फ्लाईट असे ८५ प्रकारच्या गोष्टींवर विमा कव्हर देते. सायकल चोरी क्लेमसाठी एक मिनिटाचा व्हिडीओ करून त्यात घटनाक्रम सांगायचा. अर्थात तुम्ही पाठविलेला व्हिडीओ किती विश्वासार्ह याचा निर्णय कंपनी घेते. त्यासाठी फेसस्टॉर्म नावाच्या इस्रायली कंपनीचे सोफ्टवेअर काम करते. हे सोफ्टवेअर विमा भरपाई साठी दावा करणाऱ्याचे अनेक पॅरामीटर्स चेक करते आणि दावा खरा का खोटा याचा निर्णय देते.


यंदा मान्सून मध्ये सुमारे २५ हजार लोकांनी ओमीड्यार नेटवर्क, कलारी कॅपिटल, टॉफी इन्शुरन्स या कंपन्यांकडे डेंगू कव्हर साठी विमा केला असे आकडेवारी सांगते. यात जून अखेर ते ऑक्टोबर पर्यंत ५५० रुपयात १ लाखाचे विमा कव्हर दिले गेले. टॉफी इन्शुरन्सने नोव्हेबर ते फेब्रुवारी या काळासाठी श्वसन विकारांवर विमा आणला आहे. विशेष म्हणजे नवीन जमान्याच्या या स्टार्टअप, विविध कंपन्यांशी भागीदारी करून त्यांच्या प्रोडक्ट साठी विमे उतरवून देण्याचे काम करत आहेत. हे विमे कमी मुदतीचे, कमी प्रीमियमचे आणि तत्काळ भरपाई देणारे असल्याने या क्षेत्राची वाढ वेगाने होत आहे असे समजते.

Leave a Comment