यंदा दिवाळी पूजेत मेड इन इंडिया मूर्तीची चीनी ड्रॅगनवर मात


दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला असून प्रथेप्रमाणे दिवाळीत मूर्ती पूजा करण्यासाठी देवदेवतांच्या मूर्तीची खरेदी जोरात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे गेली पाच सहा वर्षे बाजारात चीन मधून आयात केलेल्या स्वस्त मूर्तीना मोठी मागणी होती मात्र यंदा या चीनी ड्रॅगन चे आव्हान मोडून काढत मेड इन इंडिया मूर्तीना ग्राहक अधिक पसंती देत असल्याचे सुखद चित्र बाजारात दिसते आहे. भारतीय बाजारावरचा चीनी ड्रॅगचा विळखा यंदा खुपच सैल झाला असून बाजारात खूप कमी व्यापाऱ्यांनी चीन मधून मूर्ती आयात केल्याचे सांगितले जात आहे.


दिल्ली व्यापार महासंघाचे अध्यक्ष देवराज बावेजा म्हणाले यंदा चीनी मूर्ती तुलनेत महाग असून त्याच्या किमतीत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे हे एक कारण आहे तसेच दुसरे कारण म्हणजे यंदा भारतीय मूर्तीकारांनी त्यांच्या उत्पादनात खुपच सुधारणा केली असून अतिशय सुबक आणि सुंदर मूर्ती बनविल्या आहेत. त्यांनी चीनी तंत्र समजून घेऊन त्यांच्या मूर्ती घडविल्या आहेत. त्यामुळे गेली काही वर्षे चीनी मूर्तींची विक्री ५० ते ७० टक्के होती ती यंदा १० टक्क्यावर आली आहे.


गेली काही वर्षे दिवाळीत चीनी सामानावर बहिष्कार घालण्याची चळवळ चालविली जात आहे. त्याचाही परिणाम दिसू लागला आहे. कॅटचे महासचिव प्रवीण खंडेलवाल म्हणाले गतवर्षी चीनी इलेक्ट्रिक सामानावर या बहिष्काराचा परिणाम दिसत होता यंदा तो मूर्तीवरही दिसू लागला आहे. यात व्यापारी लोकांचे योगदान मोठे आहे तसेच ग्राहकांनीही चीनीपेक्षा भारतीय मालाला अधिक पसंती दिली आहे. दिवाळीत साधारण लक्ष्मी, गणेश, हनुमान, ब्रह्मा विष्णू महेश, शिव परिवार, दुर्गा, सरस्वती यांच्या मूर्तीना मोठी मागणी असते. यंदा लाफिंग बुद्धाला विशेष पसंती असून ही गिफ्ट देणे शुभ मानले जाते. बाजारात या मूर्ती २०० पासून २००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

Leave a Comment