ऑनलाईन खरेदी करताना …


सणासुदीचे दिवस आले, घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असला, किंवा लग्नसराई सुरू झाली की खरेदीची धामधूम सुरु होते. आणि केवळ सण-समारंभच कशाला, एरवी देखील काही ना काही कारणांनी आपली खरेदी सुरूच असते. पण आताच्या इंटरनेटच्या युगामध्ये कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यासाठी घराच्या बाहेर पडायची तितकीशी गरज भासत नाही. फर्निचर पासून ते अगदी भाजीपर्यंत सगळे एका “क्लिक” मध्ये घरबसल्या मागवण्याची सोय आता आहे. कपडे, दाग-दागिने तसेच आधुनिक विद्युत उपकरणे सगळे ऑनलाईन सहज उपलब्ध आहे. इतकेच कशाला, परदेशातून आपल्याला हव्या असलेल्या वस्तू आपण ऑनलाईन खरेदी करून मागवू शकतो. त्यातूनही बऱ्याच वेबसाईट्स वर खरेदी करताना अनेक आकर्षक ऑफर्स किंवा डिस्काउंट मिळत असल्यामुळे खरेदीचा आनंद दुणावतो. पण ऑनलाईन खरेदी करताना काही गोष्टी आपण विचारात घेऊन मग खरेदी केल्यास आपण “ऑनलाईन ग्राहक” बनतानाच “स्मार्ट कस्टमर” पण होऊ शकतो.

सर्वप्रथम, ऑनलाईन खरेदी करताना ज्या वेबसाइट्सच्या मार्फत आपण खरेदी करणार असू ती वेबसाईट, वस्तूंची उपलब्धता आणि दर्जा या बाबतीत कशी आहे ते पाहून घ्यावे. या बाबतीत मित्र मंडळींचा सल्ला अवश्य विचारात घ्यावा. वेबसाइट्स ने जाहीर केलेल्या आकर्षक ऑफर्स किंवा सवलतींच्या मोहात न पडता, आपल्याला हवी असलेली वस्तू उत्तम brand ची आणि चांगल्या दर्जाची आहे की नाही हे पहावे.

आपण ज्या वस्तू खरेदी करणार असू, त्याबद्दलची पूर्ण माहिती इंटरनेट वर उपलब्ध असते. त्याशिवाय निरनिरळ्या वेबसाइट्स वर त्याच वस्तूच्या किमतीतही तफावत असते. वस्तू खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या वेब साइट्स वर जाऊन किमतीतला फरक तर पहावाच, पण त्या वस्तूबद्दल ग्राहकांनी दिलेले “reviews” सुद्धा अवश्य विचारात घ्यावेत. “ reviews” च्या द्वारे वस्तूची उपयुक्तता आणि दर्जा या बद्दल माहिती मिळते. त्यामुळे वस्तूची खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या वेबसाइट्स वर त्या वस्तूंचे reviews वाचून आणि किंमतीतला फरक ध्यानात घेऊन कुठल्या वेबसाईट वरून खरेदी करायची आहे याचा निर्णय घ्यावा.

आपल्याला “कॅश ऑन डीलीवरी” हा पर्याय सोपा आणि सुरक्षित वाटतो, कारण वस्तू एकदा हातामध्ये आल्यानंतरच पैसे द्यायचे हा विचार त्यामागे असतो, आणि तसे वाटणे योग्य ही आहे. तसेच, डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड चा वापर करून पैसे भरल्यास आपल्याला, आपण करत असलेल्या खरेदी वर काही “points” मिळतात, जे पुढील खरेदी करताना इतर वस्तू विकत घेण्यासाठी वापरता येतात ( redeem ). पुष्कळ वेबसाइट्स वर कार्ड मार्फत खरेदी केल्यास “ cash back” ऑफर सुद्धा असतात. त्यामुळे हे सगळे पर्याय विचारात घेऊन खरेदी रोख पैसे देऊन करायची किंवा कार्ड मार्फत करायची याचा निर्णय घ्यावा.

ऑनलाईन खरेदी करताना “shipping” चार्जेस किंवा ती वस्तू आपल्याला घरपोच मिळण्याकरिता किती चार्जेस आहेत हे पाहावे. त्याशिवाय इतरही कुठले चार्जेस आहेत ते पाहावे. बहुतेक वेबसाइट्स ठराविक रकमेपेक्षा जास्त खरेदी केल्यास shipping चार्जेस लावले जात नाहीत. त्याचबरोबर अनेकदा आपण खरेदी करत असलेल्या वस्तू सोबत promotional कूपन्स किंवा discount codes असतात. या कूपन्स चा किंवा codes चा वापर केल्याने वस्तूच्या खरेदीवर माफक सूट मिळते. या कूपन्स चा किंवा discount codes चा वापर कसा करावा याबद्दलच्या सूचना वेबसाईटवर उपलब्ध असतात. आपण नेहमी खरेदी करत असलेल्या वेबसाइट्स वर आपण मेंबर म्हणून नोंदणी केली असल्यास इ-मेल द्वारे ही आपल्याला discounts किंवा promotional ऑफर्स बद्दल माहिती मिळत राहते.

ऑनलाईन खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेऊन खरेदी केल्यास घरबसल्या खरेदी करण्याचा आनंद आपण लुटू शकतो.

Leave a Comment