पचनासाठी श्‍वसनयोग


खाल्लेले अन्न पचन होण्यासाठी शरीराला हालचाली मिळाल्या पाहिजेत हे तर खरेच आहे. परंतु खाण्यापूर्वी, खाण्यानंतर किंवा खाताना श्‍वासावर लक्ष केंद्रित केले आणि काही विशिष्ट प्रकारे श्‍वास घेतला तर अन्नपचन होणे सोपे जाते असा दावा मुंबईच्या स्वरयोग फाऊंडेशन या संस्थेचे डॉ. प्रमोद कुलकर्णी यांनी केला आहे. जेवणानंतर थोडीशी झोप घ्यावी. तिच्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित चालते. मात्र ही वामकुक्षी घेत असताना त्यातल्या वाम शब्दावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वाम म्हणजे डावा तेव्हा जेवणानंतरची ही डुलकी घेताना आधी डाव्या कुशीवर झोपावे आणि उठून दहा मिनिटे शांत बसून नंतर कामाला लागावे. त्याच्यामुळे अन्न चांगले पचते.

तांब्याच्या भांड्यामध्ये साठवलेले पाणी प्यावे. असे पाणी प्याल्याने शरीरातली विशेषतः पचनसंस्थेतली विषारी द्रव्ये शरीराच्या बाहेर फेकली जातात आणि पचनसंस्था शुध्द होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील उष्णता ही बाहेरच्या हवामानाशी सुसंगत अशा पध्दतीने राखली जाते. त्यामुळे दिवसभर आपल्या फ्रेश वाटते. डॉ. प्रमोद कुलकर्णी यांनी दररोज सकाळी १० मिनिटे पद्मासनात बसण्याची शिफारस केली आहे. पद्मासनात दहा मिनिटे बसावे आणि स्वादिष्ठान चक्रावर लक्ष केंद्रित करावे. हे सादिष्ठान चक्र आपल्या बेंबीच्या आसपास असते. यावेळी उजव्या नाकपुडीने पंधरावेळा श्‍वासोच्छास करावा. त्यामुळे पाचक रसांचा प्रवाह निर्दोष होतो आणि पचन सुधारते.

पचनाच्या क्रियेमध्ये उजव्या नाकपुडीने श्‍वासोच्छ्वास घेेण्यास फार महत्त्व आहे. त्यामुळे रात्री डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या कुशीवर झोपताना उजव्या नाकपुडीने जोरदार श्‍वासोच्छ्वास सुरू राहतो. त्याचा पचनावर तर चांगला परिणाम होतोच पण एकंदरीत आरोग्यावरही परिणाम होतो. जेवण झाल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी एक व्यायाम सांगितला आहे. रात्रीचे किंवा दुपारचे जेवण झाल्यानंतर जमिनीवर उताणे झोपावे आणि आठ वेळा दीर्घ श्‍वासोच्छ्वास करावा. त्यानंतर उजव्या कुशीवर वळून सोळा वेळा श्‍वास घ्यावा आणि सोडावा आणि नंतर डाव्या कुशीवर झोपून अशाच पध्दतीने ३२ वेळा श्‍वास घेण्याची आणि सोडण्याची क्रिया करावी. या प्रयोगामुळे पचनशक्ती तर बळकट होतेच परंतु अन्नाचे वितरण पूर्ण शरीरभर समानतेने होते. परिणामी शरीर निरोगी राहते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment