भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत मालिका विजय

भारताने दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 202 धावांनी पराभव केला आहे. यासोबतच भारताने मालिकेत 3-0 ने विजय मिळवला आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला त्यावेळी आफ्रिकेची स्थिती 8 बाद 132 अशी होती. चौथ्या दिवशी भारताने 9 मिनिटे आणि दोन ओव्हरमध्येच सामना आपल्या नावावर केला. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 133 धावा केल्या.

पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने 497 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताच्या या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 162 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताने फॉलोऑन दिल्यानंतर देखील दुसऱ्या डावात आफ्रिकेची स्थिती तशीच राहिली.

दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने आफ्रिकेच्या तीन खेळाडूंना बाद केले.  उमेश यादव आणि शाहबाज नदिमने प्रत्येकी 2, तर रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारताचा हा सलग तिसरा कसोटी विजय असून, दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर व्हॉइट वॉश देण्याची भारतीची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यात द्विशतकीय खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मालिकेतील तिन्ही सामन्यामध्ये रोहित शर्माने तीन शतके झळकावली आहेत.

Leave a Comment