अन् टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये दाखल झाला धोनी


रांची – तब्बल ३ महिन्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला. रांचीच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील अखेरचा कसोटी सामना रंगला होता. या सामन्यात भारताने एक डाव २०२ धावांनी विजय मिळवत मालिका ३-० ने जिंकली. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही हा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी हजेरी लावली होती. रांचीच्या कसोटीतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या शाहबाज नदीमला खास गुरु मंत्र देताना तो दिसला. बीसीसीआयने याचा फोटो पोस्ट केला आहे.


जुलै २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपासून लांब आहे. सध्या त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे आणि डिसेंबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकाच्या मालिकेतून तो संघात पुनरागमन करेल, अशी चर्चा आहे.


शाहबाज नदीम आणि संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी धोनीने सामन्यानंतर चर्चा केली. बीसीसीआयने याचे फोटो ट्विट केले आहेत. धोनी त्या फोटोमध्ये ब्लॅक टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत आहे.

रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी स्टेडियममध्ये हजर राहण्याची अपेक्षा धोनीने केली होती, पण तो काही कारणास्तव पोहोचू शकला नाही, असे समजते. विशेष म्हणजे, नदीमने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात धोनीसह झारखंड संघासाठी केली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल १५ वर्ष खेळल्यानंतर नदीमला भारतीय संघात स्थान मिळाले.

Leave a Comment