बांग्लादेशात वृद्धांमध्ये नारिंगी दाढीची क्रेझ


जगभरातील युवा पिढी आज दाढी वाढविण्याच्या फॅशन मध्ये गुंतली असताना बांग्लादेशातील ज्येष्ठ किंवा वृद्ध यांच्यात नारिंगी दाढीची क्रेझ दिसून येत आहे. राजधानी ढाकाच्या कुठल्याची गल्लीबोळात चक्कर मारली तर नारिंगी दाढी असलेले बुजुर्ग तुम्हाला जागोजागी आढळतील. गेले काही दिवस हा ट्रेंड येथे सुरु राहिला आहे.

मेंदीचा वापर करून दाढीला नारिंगी रंग आणला जातो. विशेषतः दाढी , डोक्याचे केस पांढरे झाले असतील तर ते मेंदीने रंगविले तर नारिंगी होतात. सर्वसामान्य नागरिक, अगदी इमाम लोकांनाही दाढीचा नारिंगी रंग भावतो आहे असे समजते. विशेष म्हणजे दाढी अथवा केस रंगविण्यासाठी आवश्यक मेंदी सहज आणि स्वस्तात उपलब्ध होते.


अर्थात मेंदीचा वापर करून केस नारिंगी करणे ही प्रथा बरीच जुनी आहे. भाजी बाजारात काम करणारे ६० वर्षीय अबुल मिया सांगतात दाढी नारिंगी केल्याने मी हँडसम आणि तरुण दिसतोय असे माझे कुटुंबीय मला सांगत आहेत. कॅनव्हास मासिकाचा फॅशन जर्नालिस्ट दीदार उल दिपू याने दाढी नारिंगी केलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा फॅशन आहे असे अनेकांनी उत्तर दिले. मशिदीतील इमाम सुद्धा नारिंगी दाढीच्या प्रेमात पडले असून इस्लामचे अनुयायी आहोत हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. धार्मिक पुस्तकात मोहम्मद पैगंबर यांनी केस डाय केल्याचे उल्लेख आहेत असे कारण त्यामागे सांगितले जात आहे.

Leave a Comment