केरळच्या या सुंदर गावात बनतात जगप्रसिध्द आरसे


देवाचा देश अशी ख्याती असलेल्या केरळ राज्यात अनेक सुंदर गावे आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या राज्यातील एक असेच सुंदर गाव आहे अराणमुला. विशेष म्हणजे येथील काही कुटुंबांचे रोजचे आयुष्य इतिहासाशी जोडले गेलेले आहे. ऐतिहासिक वारश्याशी जोडल्या गेलेल्या या गावातील काही गल्ल्या तुम्हाला खिळवून ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. कारण शतकानुशतके येथे विशिष्ट प्रकारचे आरसे बनविले जातात आणि जगात त्या आरश्यांची ख्याती आहे. अराणमुला कान्नाडो म्हणजे आरणमुलाचे आरसे. या आरश्याना जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे जीआय टॅग मिळाला आहे. आजही हे आरसे कसे बनतात त्या प्रक्रियेचे रहस्य कायम आहे.


येथील नागरिक पूर्वीपासूनचा वास्तूतज्ञ मानले जातात. या गावात आणि केरळात असलेली अनेक द्रविड शैलीतील मंदिरे याच कारागिरांनी बांधलेली आहेत. त्याचे काम पाहून त्रावणकोरच्या राजाने त्यांना खास आमंत्रण पाठवून त्याच्याकडून अनेक मंदिरे बांधून घेतली असे सांगितले जाते. या कारागिरांना विश्वकर्मा म्हटले जाते. अराणमुलाचे प्रसिद्ध पार्थसारथी मंदिर, तिरुवनंतपुरमचे जगप्रसिध्द पद्मनाथ मंदिर, चेन्ग्नुर महदेव, हरिपादचे श्री मुरुगा मंदिर अशी त्यांच्या कलेची अनेक उदाहरणे आजही पर्यटकांचे आकर्षण बनून राहिले आहेत.


आरणमुला आरसे नेहमीच्या आरश्याप्रमाणे काचेपासून म्हणजे काचेला पारा लावून बनविले जात नाहीत तर ते धातूपासून बनविले जातात. हे आरसे बनविण्याची प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची असून एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे अशी ती संक्रमित झाली आहे. आता असे आरसे बनविणारे थोडेच कलाकार येथे आहेत. भट्टीमध्ये धातूवर विशिष्ट प्रक्रिया करून तो इतका चकचकीत बनविला जातो की त्याचा पृष्ठभाग आरश्याप्रमाणे चकचकीत बनतो.

काचेपासून बनलेले आरसे अनेकदा प्रतिमा वाकडी दाखवितात,तो दोष या आरशात सापडत नाही. या आरशाना जगभरातून मोठी मागणी आहे. त्यामानाने त्यांचे उत्पादन मर्यादित आहे. या आरशाच्या किमतीही अधिक आहेत कारण त्यांची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे.

Leave a Comment