कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणार उमेश यादव एकमेव फलंदाज


रांची : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. यात रोहित शर्माने द्विशतक तर अंजिक्य रहाणेने शतकी खेळी लक्षणीय ठरली. त्याचबरोबर दुसऱ्या सत्रात भारताचा गोलंदाज उमेश यादवने केलेल्या फटकेबाजीची चर्चा जोरात रंगली आहे. 10 चेंडूत 31 धावांची खेळी उमेश यादवने केली. तब्बल 5 षटकारांचा यात समावेश होता.

कसोटीमध्ये टी-20 सारखी फलंदाजी करून उमेश यादवने अनेक विक्रम नावावर केले. आपल्या खेळीतील पाचही षटकार एकाच खेळाडूच्या गोलंदाजीवर उमेश यादवने मारले. उमेश यादवने आपल्या खेळीत लिंडेच्या 8 आणि पीटच्या 2 चेंडूंचा सामना केला. यात पीटच्या गोलंदाजीवर फक्त एक धाव काढली. त्यानंतर उरलेल्या 8 चेंडूत 5 षटकारांसह 30 धावा केल्या. लिंडेच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला.

उमेश यादव कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात एकही चौकार न मारता 5 षटकार लगावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. 10 चेंडूत 31 धावांची खेळीसुद्धा सर्वात वेगवान 30 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये आहे. 10 चेंडूत सर्वाधिक धावा करणाऱा फलंदाज ठरला आहे. याआधी कीथ बॉयसने 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध 26 धावांची खेळी केली होती. त्यानंतर टीम साउथीचा नंबर लागतो. त्याने 2019 मध्ये लंकेविरुद्ध नाबाद 24 धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या क्रमांकवर कपिल देव असून त्यांनी 1986 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 धावा केल्या होत्या.

उमेश यादव कसोटीत डावाच्या सुरुवातीला पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार मारणारा जगातील तिसरा आणि भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी 1948 मध्ये फोफी विलियम्सने इंग्लंडविरुद्ध आणि 2013 मध्ये सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. 310 च्या स्ट्राइक रेटने उमेश यादवने धावा केल्या. न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगचा 15 वर्ष जुना विक्रम त्याने मोडला. फ्लेमिंगने 2004 मध्ये 11 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि एक षटकार मारला होता.

उमेश यादवने जॉर्ज लिंडेच्या चेंडूवर षटकार खेचून खाते उघडल्यानंतर पुढच्या चेंडूवरही उमेश यादवने षटकार खेचला. त्यावेळी चाहत्यांसह ड्रेसिंगरूममध्ये असलेल्या विराट कोहलीलासुद्धा आनंद लपवता आला नाही. इकडे मैदानावर जॉर्ज लिंडेनं उमेश यादवसमोर हात जोडले होते.