या मंदिराचे आहे पुष्यनक्षत्राशी नाते


दिवाळी तोंडावर आली आहे आणि २१ व २२ ऑक्टोबर रोजी पुष्यनक्षत्राच्या मुहूर्तावर दिवाळीचा शुभारंभ होत आहे. तामिळनाडूच्या तंजोरजवळ विलनकुलम येथे असलेले अक्षयपुरीश्वर मंदिर हे अनोख्या कारणाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर पुष्य नक्षत्राशी संबंधित आहे. म्हणजे हे शनिमंदिर असून पुष्यनक्षत्राचा स्वामी शनी आहे. शनीच्या पंगु पायाचा आणि त्या संदर्भात शनीने केलेल्या शिवउपासनेचा त्याच्याशी संबंध आहे. पुष्य नक्षत्रावर महादेवाने शनीला येथे दर्शन दिले आणि त्यांची पंगुत्वातून मुक्तता केली असा समज आहे. यामुळे पुष्य नक्षत्रावर ज्यांचा जन्म झाला आहे किंवा साडेसतीमध्ये ज्यांचा जन्म झाला आहे असे लोक येथे येऊन विशेष पूजा अर्चा करतात आणि नक्षत्रशांती मिळवितात.

हे मंदिर वास्तविक शिवाला समर्पित आहे. मंदिराची वास्तुकला अप्रतिम असून चोल शासक पराक्र पंद्याल याने हे मंदिर १३३५ ते १३६५ या काळात बांधल्याचे सांगितले जाते. याचाच अर्थ हे मंदिर ७०० वर्षे जुने आहे. येथे शिवाला अक्षयपुरीश्वर म्हटले जाते. शक्ती देवी अभिवृद्धी नायकी स्वरुपात येथे विराजित असल्याचे मानले जाते. या मंदिराची कथा अशी की, शनीदेवाने पुष्य नक्षत्र व अक्षयतृतीया योगावर त्याचा पंगु रोग दूर व्हावा म्हणून शिवउपासना केली होती. येथे बेलाची झाडे खूप आहेत. त्यांच्याच मुळात पाय अडकून पडल्याने शनिदेव पंगु झाले होते. तेव्हा शनीच्या उपासनेने शिव प्रकट झाले आणि त्यांनी शनी देवाला विवाह होईल आणि पंगुत्व दूर होईल असा आशीर्वाद दिला. तमिळ विलन शब्दाचा अर्थ बेल आणि कुलम म्हणजे झुंड किंवा गर्दी असा अर्थ आहे.

येथे शनिदेव पत्नी मंदा आणि ज्येष्ठा यांच्यासह विराजमान आहेत. शनी हा आठ या आकड्याचा स्वामी मानला जातो. त्यामुळे येथे ८ वेळा ८ वस्तूंनी पूजा केली जाते आणि डावीकडून उजवीकडे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात. मंदिराचे गर्भगृह काळोखे असून तेथे विशाल शिवलिंग आहे. मंदिराचे प्रांगण खूप मोठे असून अनेक छोटे मंडप आहेत. गणेश, नंदिकेश्वर, दुर्गा, गजलक्ष्मी यांच्याही मूर्ती आहेत.

Leave a Comment