यंदाही दणकून सोनेखरेदी करणार ग्राहक


२१ आणि २२ ऑक्टोबर रोजी पुष्यनक्षत्र असून या दिवसापासून वर्षाचा मोठा सण दिवाळीची सुरवात होत आहे. देशात सध्या मंदीसदृश वातावरण असले तरी यंदाही दिवाळीला ग्राहक दणकून सोने खरेदी करतील असा अंदाज कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट)चे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी वर्तविला आहे. दिवाळीचे खरेदीशी अतूट नाते आहे. दिवाळीच्या निमित्ताने दागिने, कपडे, भांडीकुंडी, गृहपयोगी वस्तू, गाड्या, घरे यांची मागणी वाढते. यंदा देशात मंदी असली तरी दिवाळी येताच या वस्तूंची मागणी वाढू लागली आहे.

खंडेलवाल म्हणाले दरवर्षी दिवाळी दरम्यान किमान ४५ लाख कोटींची उलाढाल होते. दसरा ते दिवाळी या २० दिवसातच ही उलाढाल ५ ते ६ लाख कोटींची असते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वस्तूंना मागणी थोडी कमी असली तरी ऐन दिवाळीत ती वाढेल असे संकेत मिळत आहेत.


सोने निर्यातदार राजेश मेहता म्हणाले, यंदा मंदी असली तरी दिवाळीत किमान ३७ टन सोने खरेदी नाणी व दागिने स्वरुपात होईल असा अंदाज आहे. सोन्याचे भाव वाढलेले आहेत तरी ७ ते ८ टन सोन्याची नाणी आणि ३० टन सोन्याचे दागिने असा १४ ते १५ हजार कोटींचा व्यवसाय अपेक्षित आहे. यंदा सोने नाण्यांना विशेष मागणी आहे तसेच कमी वजनाचे दागिने म्हणजे अंगठ्या, कानातले डूल, मंगळसूत्रे याना विशेष मागणी आहे. पुष्य नक्षत्र आणि धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची प्रथा भारतात आहे आणि बहुतेक लोक या दिवशी थोडीफार का होईना पण मुहूर्ताची म्हणून खरेदी करतात असा अनुभव आहे.

Leave a Comment