अतिदुर्गम भागातील महत्वाच्या रिनचीन पुलाचे उद्घाटन


सोमवारी पूर्व लडाखच्या अति दुर्गम दुर्बुक व दौलतबेग ओल्डी यांना जोडणाऱ्या १४०० फुट लांबीच्या आणि १३ हजार फुट उंचीवर बांधल्या गेलेल्या पुलाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते उद्घाटन केले जात आहे. चीन सीमेजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ४० किमी अंतरावर हा पूल बांधला गेला असून त्याचे नामकरण लायन ऑफ लडाख म्हणून परिचित असलेले कर्नल चेवांग रिनचीन यांच्या नावावरून रिनचीन ब्रीज असे केले गेले आहे. या कार्यक्रमात कर्नल रिनचीन यांची मुलगी सामील होणार आहे. श्योक नदीवर बांधला गेलेला हा पूल २५५ किमी लांबीच्या दुर्बुक आणि दौलतबेग ओल्डी या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंड (एअरबेस) ला जोडणार आहे. हा एअरबेस १६ हजार फुट उंचीवर आहे.


हा पूल काराकोरम जवळ असून तेथून सीमा फक्त ८ किमीवर आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर १४ तासांचा प्रवास ६ तासात पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे चीन सीमेवर सैनिक मदत कमी वेळात पोहोचू शकेल. जम्मू काश्मीर चीन सीमेची लांबी १५९७ किमी असून ही सीमा एलएसी म्हणून ओळखली जाते.

कर्नल चेवांग रिनचीन यांनी भारतासाठी तीन युद्धे लढली असून त्यांना दोनवेळा अति सन्मानाच्या महावीर चक्र पुरस्काराने गौरविले गेले होते. पाकिस्तान विरुद्ध १९४८ आणि १९७१ तसेच चीनविरुद्ध १९६२ च्या युद्धात कर्नल सहभागी होते आणि आपल्या अदम्य साहसाचा आणि नेतृत्वाचा परिचय त्यांनी या काळात करून दिला होता.