‘हिटमॅन’ने मोडला डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरूध्द सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतकीय खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. घरच्या मैदानावर रोहित सर्वोत्तम कामगिरी करणारा फलंदाज ठरला आहे. 32 वर्षीय रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेच्या तिन्ही कसोटी सामन्यात तीन शकत ठोकले आहेत. रांची येथील कसोटीत त्याने 255 चेंडूमध्ये 28 चौकार आणि 6 षटकारांच्या साहय्याने 212 धावा केल्या.

रोहित शर्माने घरच्या मैदानावर खेळताना 12 कसोटींमध्ये (18 डाव) 99.84 च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. आपल्या करिअर दरम्यान घरच्या मैदानावर कमीत कमी 10 कसोटीमध्ये सर्वाधिक सरासरीने फलंदाजी करताना रोहितने ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांना देखील मागे टाकले आहे.

ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या 33 कसोटी सामन्यांमधील 50 डावांमध्ये 98.22 च्या सरासरीने 4322 धावा केल्या आहेत. त्यांच्यानंतर वेस्ट इंडिजच्या जॉर्ज हॅडली यांनी 10 कसोटीत 77.56 आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने 29 कसोटीत 77.25 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

रोहितने भारतात खेळलेल्या 12 कसोटींमध्ये 99.84 च्या सरासरीने 1298 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 200 धावा करणारा चौथा खेळाडू आहे. याआधी सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी ही कामगिरी केली आहे.

रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक 19 षटकार खेचले आहेत. एका कसोटी मालिकेत हा सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमेअरच्या नावावर होता. त्याने 2018-19 मध्ये बांग्लादेश विरूध्दच्या 2 सामन्याच्या मालिकेत 15 षटकार मारले होते.

 

Leave a Comment