मनासारखा नवरा शोधून न दिल्यामुळे मॅट्रोमोनियल एजेेंसीला 62 हजारांचा दंड

आजच्या काळात तंत्रज्ञानाच्या वापराबरोबर लग्न करण्यासाठी जोडीदाराचा शोध देखील मॅट्रिमोनी साइट्सवर घेतला जातो. चंदीगडमधील मॅट्रोमोनी सर्विस प्रोवाइडरचे असे प्रकरण समोर आले आहे की, ज्याने सर्वचजण हैराण झाले आहेत. चंदीगडमधील एका मॅट्रोमोनियल सर्विस प्रोवाइडरला आपल्या ग्राहकाच्या मुलीला वर शोधून न देणे चांगलेच महाग पडले आहे. वर शोधू न शकल्याने मॅट्रोमोनियल सर्विस प्रोवाइडरला 62 हजार रूपये दंड भरावा लागणार आहे.

काय आहे पुर्ण प्रकरण ?

सुरेंद्र पाल सिंह चहल आणि त्यांच्या पत्नी नरेंद्र कौर चहल यांनी चंदीगढ कंज्यूमर फोरममध्ये 6 डिसेंबर 2018 ला एक तक्रार दाखल केली होती. यामध्ये म्हटले आहे की, 2017 पासून ते आपल्या डॉक्टर मुलीसाठी चांगल्या वराच्या शोधात आहेत. याचवेळी त्यांची भेट वेडिंग विश प्रायव्हेट लिमिडेट यांच्याशी झाली. मुलीला मंगळ होता. त्यांनी मॅट्रोमोनियल सर्विस प्रोवाइडरला चंदीगढ व आजुबाजूच्या परिसरातील जाट समुदायातील मंगळ असलेला डॉक्टर मुलगा शोधण्यास सांगितले.

चहल कुटुंबाने 26 सप्टेंबर 2019 ला रॉयल पॅकेज घेत करार केला. याच्या सदस्यतेसाठी त्यांनी 50 हजार रूपये देखील भरले. कंज्यूमर फोरमला करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जे प्रोफाईल त्यांना दाखवण्यात आले, ते अजिबात योग्य नव्हते.

तक्रारीनुसार, मॅट्रोमोनियल सर्विस प्रोवाइडर योग्य वराची प्रोफाईल उपलब्ध करू शकले नाहीत. चहल कुटुंबाने चंदीगढपासून 60 किमी लांब असलेला वर देखील चालेल असे सांगितले. मात्र तरीही योग्य प्रोफाईल त्यांना दाखवण्यात आले नाही.

कंज्यूमर फोरमने मॅट्रोमोनियल एजेंसीला ग्राहकांचा वेळ वाया घालवला यासाठी जबाबदार धरले व एजेंसीवर 62 हजारांचा दंड देखील लावला.

Leave a Comment