मोदींचे भाषण सुरू होताच कार्यकर्त्यांची सभेतून एक्झिट


मुंबई – मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमध्ये शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युतीची जाहीर सभा झाली. पण कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होताच काढता पाय घेत मैदानातून एक्झीट मारली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकच उरले नसल्याच्या टीकेचा या सभेमध्ये पुनरुच्चार केला. त्यासोबतच ईडीचा वापर, सुशीलकुमार शिंदेंचे काँग्रेस-राष्ट्रवादी थकल्याचे वक्तव्य अशा मुद्द्यांवर देखील त्यांनी टीका केली. पण एकीकडे स्टेजवर हे सगळे घडत असताना दुसरीकडे समोर बसलेल्या कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये काहीतरी वेगळेच घडले. भाषणांमध्ये सर्वात आधी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि सर्वात शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले.

मोदींच्या भाषणासाठी कधीकाळी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत होते. पण उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर लगेचच अनेकांनी घरचा रस्ता पकडल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता, असे समजत आहे.

समोर बसलेल्या अनेक मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंचे भाषण होताच सभेमधून काढता पाय घेतला. गेटवर सभास्थानावरून बाहेर पडलेल्या मुंबईकरांची गर्दी दिसत होती आणि आत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असल्याचे चित्र दिसत होते. नरेंद्र मोदींचा असाच एक व्हिडिओ लोकसभा निवडणुकांवेळी देखील व्हायरल झाला होता, मोदी ज्यामध्ये भाषण करत असताना मैदानाच्या मागच्या बाजूने लोकं निघून जात होते. आता पुन्हा एकदा मुंबईच्या बीकेसीमध्ये तसा प्रकार दिसून आला आहे.

Leave a Comment