तिसरी कसोटी : भारताच्या पहिल्या दिवसाखेर ३ बाद २२४ धावा


रांची – सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आघाडी कोलमडल्यानंतर भारताचा डाव सावरला. मालिकेत आणखी एक शतक झळकावत रोहित शर्माने कसोटीतील आपले सहावे शतक पूर्ण केले. षटकार खेचत त्याने शतकाला गवसणी घातली. अजिंक्य रहाणे त्याला उत्तम साथ देत आहे. भारताच्या पहिल्या डावातील ५८ षटकांच्या खेळानंतर भारताच्या धावफलकावर ३ बाद २२४ धावा असताना पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर अधूंक प्रकाशामुळे अखेर दिवसांचा डाव ३२ षटके बाकी असतानाच थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतला. रोहित शर्मा (११७)* आणि अजिंक्य रहाणे (८३)* धावांवर पहिल्या दिवसाखेर नाबाद आहेत.

रांचीच्या मैदानात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करणाऱ्या भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मयंक अग्रवालच्या रूपात रबाडाने भारताला पहिला धक्का दिला. १९ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने त्याने १० धावा केल्या. रबाडाने पुजाराला खातेही उघडू दिले नाही. धावफलकावर १६ धावा असताना भारताला दुसरा धक्का बसला. त्यानंतर आलेला विराट कोहलीही १२ धावा करुन तंबूत परतला. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या जोडीने ३ बाद ३९ धावांवरुन भारताला दोनशे धावांचा टप्पा पार करुन देत आफ्रिकेच्या गोलंदाजांचे मनसुबे उधळून लावले. या जोडीच्या खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी खराब सुरुवातीनंतर देखील आफ्रिकेला बॅकफूटवर टाकले.

Leave a Comment