जवानांनी या युक्तीने साधला करवाचौथ दिवशी पत्नीशी संपर्क


देशभरात बहुसंख्य महिलांनी पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी करवाचौथचे व्रत करून दिवसभर निर्जळी उपवास केला असताना या दिवशी नक्षलग्रस्त भागात आपली ड्युटी बजावत असलेल्या सैनिकांनी पत्नीशी संवाद साधण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली. कोंडगाव जिल्ह्यामधील हादेली ग्राम परिसरात तैनात असलेल्या आयटीबीपी जवानानी चक्क झाडावर मोबाईल टांगून ब्ल्यूटूथच्या सहाय्याने कुटुंबियांशी संवाद साधला आणि निष्ठेने त्यांच्यासाठी व्रत करणाऱ्या पत्नीना सुखद धक्का दिला.

या भागात तैनात असलेल्या आयटीबीपीच्या ४१ व्या वाहिनीचे असिस्टंट कमांडर सुरेश यादव यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले जिल्हा मुख्यालयापासून ४० किमीवर असलेले हादेली ग्राम चोहोबाजूंनी जंगल आणि पर्वतरांगानी वेढलेले आहे. येथे मोबाईल नेटवर्क ही नेहमीची समस्या असून बीएसएनएलचे नेटवर्क गेले महिनाभर बंद आहे तर जिओचे नेटवर्क मिळविण्यासाठी खूप प्रयास करावे लागतात.

करवा चौथ साजरी होते तेव्हा हे व्रत करणाऱ्या महिला पतीचा एक शब्द ऐकण्यासाठी आतुर असतात. त्यामुळे आम्ही झाडावर दोरी टाकून नेटवर्क पकडले. सर्व मोबाईल फोन प्लास्टिकच्या डब्यावर ठेऊन दोरीच्या सहाय्याने झाडावर लटकावले. गुरुवारी चंद्र दिसला तेव्हा हे फोन झाडावर चढविले आणि नेटवर्क मिळताच ब्ल्यूटूथने कनेक्ट करून घरच्या मंडळींशी संपर्क साधला त्यामुळे कुटुंबीय आणि आम्ही सर्व खूप आनंदित झालो. टाळ्या वाजवून आम्ही आमचा आनंद व्यक्त केला.

Leave a Comment