काल्पनिक नाही महाभारत युद्ध


बागपतच्या सनौली गावात झालेल्या उत्खननात भारतीय पुरातत्व विभागाला प्रथमच सापडलेले घोडे, रथ, नऊ सैनिकांचे सांगाडे, युद्धकालीन तलवारी यामुळे महाभारतात वर्णन केलेले महायुद्ध हे काल्पनिक नाही तर तर ते खरोखरच झाले होते याची पुष्टी होत असल्याचा दावा भारतीय पुरातत्व विभागाने केला आहे. २०१८ मध्ये उत्खननात सापडलेल्या या वस्तू प्रथम हडप्पा संस्कृतीशी संबंधित असाव्यात असा तर्क केला गेला होता. मात्र त्यावर अनेक चाचण्या केल्यानंतर या वस्तू किमान ४ हजार वर्षापूर्वीच्या असल्याचे दिसून आले आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख संजयकुमार मंजुळ या संदर्भात म्हणाले, १ वर्षापूर्वी आम्ही हा दावा खात्रीपूर्वक करू शकलो नव्हतो पण आता मात्र त्याबाबत आमची खात्री पटली आहे.


मंजुळ म्हणाले येथे सापडलेल्या वस्तूंच्या अनेक चाचण्या केल्या गेल्या. त्यात एक्सरे, सिटी स्कॅन, डीएनए रिपोर्ट अश्या अनेक चाचण्यांचा समावेश आहे. यातून या वस्तू महाभारतकालीन आहेत याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाभारत कालीन महायुद्धात विविध २५ ठिकाणाहून लढण्यासाठी योद्धे आले होते. अगदी त्यावेळचा गंधार म्हणजे आजचे कंधारपासून पानिपत, बर्नावा, हस्तिनापुर, इंद्रप्रस्थ, दिल्ली यांचे उल्लेख येतात. महाभारतात दाह संस्कार केले जात होते याचे उल्लेख आहेत. त्यावेळी वर्णन केलेली स्थळे आजही अस्तित्वात आहेत. हडप्पा संस्कृती महाभारताशी समकालीन मानली जाते. महाभारतात सनौलीचे उल्लेख असून उत्खननात सापडलेल्या वस्तू त्यांच्याशी मेळ खात आहेत.


ग्रीस, मेसोपोटेमिया मध्येही रथ सापडले आहेत पण ते युद्ध रथ नाहीत तर सामान वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे रथ आहेत. इतिहासकारांच्यामध्ये कितीही मतभेद असले तरी महाभारताचे युद्ध काल्पनिक नाही असे आता खात्रीने सांगता येईल असा दावा भारतीय पुरातत्व विभागाने केला आहे.

Leave a Comment