या कंपनीचे मोबाईल क्रमांक १ नोव्हेंबरपासून होणार कायमचे बंद


नवी दिल्ली – जर तुम्ही एअरसेल आणि डिशनेट वायरलेसची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी ३१ ऑक्टोबरपूर्वी आपला क्रमांक दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर पोर्ट करावा लागणार आहे. या कंपन्यांचे ट्रायच्या अहवालानुसार सध्या ७ कोटी ग्राहक आहेत. मोबाइल क्रमांक अखेरच्या तारखेपूर्वी पोर्ट न केल्यास संबंधित क्रमांक कायमचा बंद होणार आहे.

टेलिकॉम क्षेत्रातील रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनंतर अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तर जिओच्या धसक्यामुळे काही कंपन्यांना टाळे देखील लागले. आपली सेवा बंद करण्याचा निर्णय २०१६ ते २०१७ या कालावधीत तग धरल्यानंतर २०१८ च्या सुरूवातीला एअरसेलने घेतला होता. एअरसेलने यानंतर ट्रायचा दरवाजा ठोठावला होता. कंपनीने त्यानंतर आपल्या ग्राहकांसाठी युनिक पोर्टिंग कोडची सुविधा दिली होती. पण आता एअरसेलला ३१ ऑक्टोबरपर्यंतच सेवा देता येणार असल्याचे ट्रायने स्पष्ट केल्यानंतर या कंपनीचा मोबाइल क्रमांक कायमचा बंद होणार आहे.

एअरसेलने सेवा बंद करण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला त्यावेळी तब्बल ९ कोटी ग्राहक कंपनीकडे होते. ट्रायच्या अहवालानुसार, २८ फेब्रुवारी ते ३१ ऑगस्टदरम्यान केवळ १.९ कोटी ग्राहकांनीच आपले क्रमांक पोर्ट केले, तर ७ कोटी ग्राहकांकडे अद्यापही एअरसेलचीच सेवा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आपली सेवा बंद करण्यापूर्वी कंपनीने अनिल अंबानी यांच्या आरकॉममध्ये आपली कंपनी मर्ज करण्याचा प्रयत्न केला होता. पण काही तांत्रिक कारणामुळे ते शक्य झाले नाही.

आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, आसाम, बिहार, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, कोलकाता, मुंबई, नॉर्थ ईस्ट, ओदिशा, पंजाब, राजस्थान, तामिलनाडू, उत्तर प्रदेश (पूर्व) आणि पश्चिम बंगाल सर्कलमध्ये एअरसेल आणि वायरलेस डिशनेटचे ग्राहक आहेत. एअरसेलच्या ग्राहकांना २ जी आणि ३जी नेटवर्क मॅन्युअली सिलेक्ट करून सेवेचा लाभ घेता येणार आहे. मॅन्युअली नेटवर्क सिलेक्ट न केल्यास फोनवर नेटवर्क दिसणार नाही.

Leave a Comment