नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींवर पियुष गोयल यांची टीका


मुंबई – केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत असल्याचे म्हणणाऱ्या नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्यावर डाव्या विचारांचे असल्याचा ठपका ठेवला आहे. भारतीयांनी यापूर्वीच अभिजीत यांची डावी विचारसारणी नाकारली असल्यामुळे त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचे विचार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचा टोला गोयल यांनी लगावला आहे.

गोयल सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आहेत. त्यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला होता. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली होती. माझ्या मते भारतीय अर्थव्यवस्था खूप वाईट स्थितीतून जात आहे. २०१४-१५ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. खूप खूप वर्षांनंतर पहिल्यांदाच असे घडते आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे.

त्याचबरोबर त्यांनी अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे हे कोणत्या आकडेवारीवरून शोधायचे असाही प्रश्न भारतात निर्माण झाला असल्याचे म्हटले होते. सरकार त्यांच्यासाठी नकारात्मक असलेली आकडेवारी थेटपणे चुकीची असल्याचे सांगते आहे, याकडेही अभिजीत यांनी लक्ष वेधले होते.

पण गोयल यांनी अभिजीत यांचे विचार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. मी सर्वप्रथम अभिजीत यांचे नोबेल पुरस्कारासाठी आभार मानतो. पण त्यांची मते आणि विचारसारणी तुम्हाला माहिती असेलच. डाव्या विचारसारणीचे ते असून भारताने ती विचारसारणी नाकारली असल्याचे गोयल म्हणाले.

Leave a Comment