शहीद सैनिकांच्या मुलांना सेहवाग देतोय क्रिकेटचे धडे


स्फोटक फलंदाजी आणि नर्मविनोदी कॉमेंटमुळे क्रिकेट रसिकांत लोकप्रिय असलेला विरू उर्फ वीरेंद सेहवाग त्याच्याविषयीचा अभिमान द्विगुणीत व्हावा असे एक काम करतो आहे. सेहवागने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला असून त्या संदर्भात तो लिहितो, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या हिरोंची मुले क्रिकेट प्रशिक्षण घेत आहेत. या मुलांचे शिक्षण सेहवागच्या झज्जर येथील इंटरनॅशनल स्कूल मध्ये सुरु असून सेहवाग त्यांना क्रिकेटचे धडे देत आहे. सेहवाग म्हणतो, ही दोन मुले आमच्याकडे शिकत आहेत याचा अभिमान वाटतो आणि आमच्यासाठी ती भाग्याची गोष्ट आहे. आमच्याकडून त्यांच्यासाठी थोडे योगदान दिले जात आहे हे आमचे नशीबच म्हटले पाहिजे.

सेहवागच्या या शाळेत पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले राम वकील आणि विजय सोरेंग यांची मुले शिक्षण घेत आहेत. राम यांचा मुलगा अर्पितसिंग हा फलंदाजीचे आणि विजय यांचा मुलगा राहुल गोलंदाजीचे प्रशिक्षण घेत आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच वीरेंद्र सेहवागने शहीद हिरोंच्या मुलांच्या शिक्षणांची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार हे शिक्षण दिले जात आहे.

Leave a Comment