देशातील सर्वात प्राचीन चौथ माता मंदिर


देशभरातील सुहासिनींनी १७ ऑक्टोबर रोजी सौभाग्य प्रदान करणाऱ्या करवा चौथचे व्रत भक्तीभावाने केले आणि पती साठी तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी देवीचा आशीर्वाद मागितला. देशातील सर्वात जुने चौथमाता मंदिर राजस्थान मध्ये असून हे मंदिर ५६७ वर्षे जुने आहे. तत्कालीन शासक भीमराजा याने हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. सवाई माधोपूर जवळ असलेल्या चौथ का बर्वाडा या गावातील १ हजार फुट उंचीच्या टेकडीवर हे मंदिर आहे. भीमराजा या ठिकाणी १४५१ मध्ये सत्तेवर होता त्याने १४६३ मध्ये हे मंदिर बांधून त्या मार्गावर छतरी आणि तलाव बांधला असे इतिहास सांगतो.

कार्तिक कृष्ण चतुर्थीला चौथ मातेची पूजा करण्याची प्रथा आहे. ही देवी दुर्गेचे रूप मानली जाते. सौभाग्य रक्षणासाठी सुवासिनी हे व्रत करून मातेला अखंड सौभाग्याचे दान मागतात. चौथ मातेच्या पूजनाने दाम्पत्य जीवन सुखाचे होते अशी श्रद्धा आहे. मंदिर असलेल्या या टेकडीवर ७०० पायऱ्या चढून जावे लागते. आजूबाजूला सुंदर हिरवाई आहे आणि गवताची कुरणे आहेत. मंदिर पांढऱ्या संगमरावरात बांधले गेले असून मंदिरात चौथ माता, गणेश आणि भैरव यांच्या मूर्ती आहेत.

मंदिराचे बंधकाम राजपुताना शैलीतील आहे. भिंतींवर शिलालेख आहेत. घरात होणाऱ्या शुभाकार्याचे निमंत्रण या देवीला देण्याची या भागात प्रथा आहे. बुंदी राजघराण्याची ही कुलदेवता मानली जाते. मातेचा नावाने कोटा येथे चौथ माता बाजार असून या देवीला संतानप्राप्तीसाठी नवस केला जातो. भावनेने केलेला नवस फलित होतो असेही सांगितले जाते. नवरात्र आणि करवाचौथ या दिवसात येथे देशाच्या विविध राज्यातून भाविक येत असतात.

Leave a Comment