घराची सजावट करताना …


“घर” म्हणजे केवळ चार भिंतींची वास्तू नव्हे. घरालासुद्धा स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते,किंवा स्वतःची एक सकारात्मक ऊर्जा असते असे म्हटले तरी त्यात फारसे काही वावगे नाही. त्यातून आजकाल आपण सगळेच आपापल्या घरांच्या सजावटीबद्दल, त्यातील वस्तूंच्या मांडणीबद्दल जरा जास्तच जागरूक झालो आहोत. आपले घर सुंदर दिसावे, आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटावे, त्याच बरोबर घरामध्ये राहणाऱ्या मंडळींवर सुद्धा घराच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असावा, असे प्रयत्न सगळेच आपापल्या परीने करत असतात. त्यासाठी वास्तुशास्त्र, किंवा फेंगशुई सारख्या शास्त्रांची मदत सुद्धा घेतली जाते. घराची सजावट करत असताना फार पैसे खर्च करून अगदी अँटिक, दुर्मिळ वस्तूच आणायला हव्यात असे नाही. अगदी साध्या-सुंदर वस्तूंच्या मदतीने घराची सजावट अगदी उत्तम प्रकारे करता येऊ शकते. त्या दृष्टीने काही गोष्टींचा विचार जरूर करावा.

१. घरातल्या शोभेच्या वस्तूंसोबत घरामध्ये लहान-मोठी फुलझाडे किंवा शोभेची झाडे आकर्षक कुंड्यांमधून लावून त्यांची सुरेख मांडणी केली असता घर अधिक प्रसन्न दिसते. सजावट पारंपारिक पद्धतीची असो, किंवा आजकालच्या आधुनिक पद्धतीप्रमाणे किंवा ट्रेंड प्रमाणे असो, त्या सजावटीला नैसर्गिक घटकाची जोड दिल्यास सजावट अधिक परिपूर्ण होते.

२. घराची एकंदर ठेवण किंवा मांडणी बघितल्यावर त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या आवडी-निवडीचा अंदाज बांधता येतो. आपल्या घराची सजावट करताना सुद्धा आपली आवड-निवड सजावटीतून प्रतीत होईल असे पाहावे. आपल्या आवडीची पुस्तके, कलाकृती,पेन्टिंग्स,आपल्या ठिकठिकाणच्या प्रवासांमधून आठवणीदाखल आणलेल्या लहान-मोठ्या वस्तु, यांनी आपल्या घराला स्वतःचे असे व्यक्तिमत्व लाभते.

३. घराची सजावट करत असताना वस्तूंची किंवा घराची एकंदर रंगसंगती विचारात घेणे चांगले. रंगसंगतीच्या बाबतीत प्रत्येकाची आवड भिन्न असू शकते. काहींना न्यूट्रल रंग पसंत असतात तर काहींना रंगांची विविधता पसंत असते. दोन्ही प्रकारच्या रंगसंगती तितक्याच प्रभावी दिसतात. भिंतींना असलेल्या रंगांनुसार पडदे, फर्निचर यांचे रंग निवडावेत.

४. घरामध्ये असलेले टेबल-लॅम्प, फ्लोअरलॅम्प, इतर लहान-मोठ्या शोभेच्या वस्तू यांची मांडणी,तसेच गालिचे, बैठकीची एकंदर रचना वेळोवेळी बदलत राहिल्यास सजावटीमधला तोचतोपणा टाळता येतो. एरवी लक्षात न आलेल्या वस्तूही, मांडणी बदलल्यामुळे चटकन लक्ष वेधून घेतात. त्यामुळे सतत नवनवीन वस्तू खरेदी न करता सुद्धा, आहे त्याच वस्तूंच्या मदतीने सजावटीमध्ये विविधता आणणे सहज शक्य होते.

५. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की आपण आपल्या घराची सजावट आपल्या मनाला पटेल अशी, आपल्या आणि आपल्या घरात राहणाऱ्या मंडळींच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन करायला हवी. त्या करता एखादी विशिष्ट “ट्रेंड” किंवा स्टाईल असायला हवी असे नाही. अशी सजावटच घराला खऱ्या अर्थाने घरपण देत असते.

Leave a Comment